पुण्यात इमारतीवरुन कोसळून 3 मजूरांचा मृत्यू

पुण्यात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरुन कोसळून तीन मजूरांचा मृत्यू झाला आहे. सिंहगड रस्त्यावर नवशा मारुती जवळ ही दुर्घटना घडली. पाटे बिल्डरच्या सेया इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील काम सुरु असताना ही घटना घडली. 

Updated: Oct 17, 2017, 11:20 PM IST
पुण्यात इमारतीवरुन कोसळून 3 मजूरांचा मृत्यू title=

पुणे : पुण्यात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरुन कोसळून तीन मजूरांचा मृत्यू झाला आहे. सिंहगड रस्त्यावर नवशा मारुती जवळ ही दुर्घटना घडली. पाटे बिल्डरच्या सेया इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील काम सुरु असताना ही घटना घडली. 

वर्षभरापूर्वी बालेवाडीत स्लॅब कोसळून नऊ मजूरांचा मृत्यू झाला होता. त्यातून बांधकाम व्यावसायिक आणि महापालिकेनं काहीच धडा घेतला नसल्याचं या दुर्घटनेमुळं पुढं आलंय. 

सिंहगड रस्त्यावरील याच इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन पडून तीन मजूरांचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. सकाळी दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृत आणि जखमी सर्वच मजूर मुळचे झारखंडचे आहेत. या दुर्घटनेनं बाधंकाम मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

बालेवाडी येथील दुर्घटनेत स्लॅब कोसळून नऊ मजूर ठार झाले होते. त्यावेळी कित्येक महिने फरार राहून बिल्डर आणि आर्किटेक्ट यांनी अटक टाळली होती. याही दुर्घटनेत मजुरांचीच चूक असल्याचं बिल्डरचं म्हणणं आहे. सुट्टी दिली असताना मजूर काम करत होते, असं बिल्डरच्या वतीनं सांगण्यात आलं. 

बांधकाम साईटवर मजुरांच्या सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना केलेल्या नव्हत्या असा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळं दिखाव्यापुरती कारवाई न करता बिल्डर, आर्किटेक्ट यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

बिल्डर जेवढे या दुर्घटनेतला जबाबदार आहेत तेवढीच जबाबदारी महापालिका अधिकाऱ्यांचीही आहे. या ठिकाणी उपस्थित असूनही महापालिका अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. बालेवाडीतील दुर्घटनेनंतरही महापालिकेच्या एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नाही. असंच चालणार असेल तर अशा दुर्घटना टळणार कशा? असा सवाल उपस्थित केला जातोय.