सिंधुदुर्ग : पोलीस विभागातील बदल्या या ठराविक कालावधीमध्ये होतच असतात. पण सिंधुदुर्गात तडकाफडकी २६ पोलिसांच्या जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी ही कारवाई केली. तसेच बदली झालेले कर्मचारी हे गेडाम यांच्या रडारवर आहेत.
सिंधुदुर्गात वाहतूक पोलीस राजा राणे यांना दोडामार्ग येथील पोलीस चौकीतच २५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. यामुळे जिल्ह्यात सुरु असलेल्या गैरप्रकारांना वाचा फुटली. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात वाळूमाफिया, मटका, जुगार याचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढले होते. तक्रार करुन देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस विभागातील साफसफाईसाठी पोलिस अधीक्षकांनी २६ पोलीस कर्मचाऱ्यांची बदली केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस प्रशासन हादरले आहे.
पोलीस दल लाचमुक्त करण्यासाठी दीक्षित कुमार गेडाम यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. २६ पोलिसांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. बदलीची कारवाई झालेले पोलीस कर्मचारी हे त्यांना नेमून दिलेल्या पोलीस चौकीचे आर्थिक व्यवहार सांभाळत होते.