बारावीच्या विद्यार्थ्यांना दुसरीच्या मुलांचे मराठी वाचता येईना!; अहवालातून विदारक चित्र समोर

ASER report : देशभरात करण्यात आलेल्या अहवालानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांना मातृभाषेतील पुस्तकही वाचता येत नसल्याचे समोर आलं आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यामध्ये असरद्वारे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. त्यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांना भागाकार जमत नसल्याचे चित्र आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 18, 2024, 05:04 PM IST
बारावीच्या विद्यार्थ्यांना दुसरीच्या मुलांचे मराठी वाचता येईना!; अहवालातून विदारक चित्र समोर title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

ASER Report : देशभरातील शैक्षणिक स्थिती मांडणाऱ्या ‘असर’ या सर्वेक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरात सर्वेक्षण केल्यानंतर अॅन्युअल स्टेट्स ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (असर) अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अहवालानुसार देशातील 14-18 वयोगटातील जवळपास 25 टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतील इयत्ता दुसरीच्या दर्जाचे पुस्तकही वाचता नीट वाचता येत नसल्याचे चित्र समोर आलं आहे. यासोबत 42.7 टक्के विद्यार्थ्यी हे इंग्रजीतील वाक्ये वाचू शकत नाहीत. यासोबत राज्यात बारावीच्या स्तराचे शिक्षण घेणे अपेक्षित असलेल्या 68 टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नाहीये. त्यामुळे हे विदारक चित्र समोर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनने देशभर केलेल्या अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन (असर) या सर्वेक्षणाचे निष्कर्ष बुधवारी जाहीर केले आहेत. यावेळेस राज्यात फक्त नांदेड जिल्ह्यातच हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यंदा 14 ते 18 वर्षे या वयोगटातील म्हणजे साधारण आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. अहवालानुसार, आठवी ते दहावीच्या 76.4 टक्के, अकरावी, बारावीतील 79 टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या विद्यार्थ्यांना येऊ शकत असलेला मराठीचा परिच्छेद वाचता आला नाही. तसेच इंग्रजीतील सोपी वाक्ये सुमारे 39 टक्के विद्यार्थ्यांना वाचता आली नाहीत.  तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भाग देण्यासारखं गणित आठवी ते दहावीतील फक्त 35.7 टक्के, तर अकरावी, बारावीच्या 32.1 टक्के विद्यार्थ्यांना सोडवता आलं आहे.

अहवालानुसार 14-18 वर्षे वयोगटातील एकूण 86.8 टक्के विद्यार्थी शाळा किंवा महाविद्यालयात नोंदणीकृत आहेत. तर वयानुसार नावनोंदणीची टक्केवारी कमी होत असल्याचे या अहवालातून समोर आलं आहे. आता शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 14 वर्षांच्या गटात 3.9 टक्क्यांवरून 16 वर्षांच्या वयोगटातील 10.9 टक्के आणि 18 वर्षांच्या मुलांमध्ये 32.6 टक्के झाले आहे.

यासोबत देशातील एकूण 5.6 टक्के तरुण हे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत आहेत. देशातील 5.6 टक्के तरुणांनी त्यासंबंधीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. तरुण महाविद्यालयीन काळाता व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे पसंत करत असल्याचेही असरच्या अहवलात म्हटलं आहे. यासोबत प्राथमिक वयोगटातील म्हणजेच सहा ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढत आहे. आकडेवारीनुसार, 2010 हे प्रमाण 96.6 टक्के होतं. 2018 मध्ये 97.2 तर 2022 मध्ये 98.4 पर्यंत हे प्रमाण पोहोचल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे.