आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपुरच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आगीने 24 हेक्टर जंगल राख झालं. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (कोअर) क्षेत्रातील ताडोबा वनपरिक्षेत्राचे अधिकारी कर्मचारी गस्तीवर असताना ही घटना उजेडात आली.
भानुसखिंडी नियतक्षेत्रातील भानुसखिंडी संरक्षीत वनात आग सुरू असल्याचं गस्तीदरम्यान लक्षात आलं. वनपथक तातडीने घटनास्थळी पोहचले. या प्रकल्पात वणवा विझविण्यासाठी अत्याधुनिक साहित्य आणि प्रशिक्षित मनुष्यबळ आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
त्यानंतर वनविभाागने आग लावलेल्या अज्ञात व्यक्तीची शोध मोहीम हाती घेतली. यात त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. कोअर क्षेत्राच्या बाहेर बफर जंगलात वायगाव (भोयर) इथल्या किसन सदाशिव जांभुळे याने त्याच्या शेतात खरिपपूर्व तयारीसाठी काडी-कचरा पेटविला होता.
पण शेतकऱ्याने लावलेली ही आग वाढत गेली आगीने रौद्र रूप केले. ही आग पसरून शेताला लागुन असलेल्या भानुसखिंडी नियतक्षेत्रातील भानुसखिंडी संरक्षीत वनातील एकुण 24 हेक्टर जंगल यात जळाले. बफरच्या या भागात वास्तव्याला असलेल्या आणि शेती कसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मार्च महिन्यात एका नोटीसीद्वारे शेतातील काडी-कचरा पेटविण्याबाबत प्रतिबंध करण्यात आला होता. तसं लेखी पत्र देखील दिले गेले.
मात्र शेतकऱ्याने याकडे दुर्लक्ष करत जंगलाला हेतुपुरस्सर आग लावुन वन व वन्यजीवांचे आश्रयस्थान नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या आरोपीवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम वनगुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकल्पात कोअर क्षेत्रात अजूनही 6 पैकी 2 गावे वास्तव्याला आहेत. त्यांच्या पुनर्वसनाची कारवाई सुरू आहे. मात्र बफर भागात वास्तव्याला असलेल्या स्थानिकांनी दाखविलेल्या हलगर्जीपणामुळे असे प्रसंग ओढवित आहेत.