अकोला बियाणे महोत्सवात 23 कोटींची उलाढाल

 राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून १ ते ६ जून या सहा दिवसांत अकोला जिल्ह्यात बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवाला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत यशस्वी केला आहे.''शेतकऱ्यांच बियाणं शेतकऱ्यांसाठी'' या संकल्पनेतून अकोल्यात बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आला.

Updated: Jun 6, 2022, 06:34 PM IST
अकोला बियाणे महोत्सवात 23 कोटींची उलाढाल title=

जयेश जगड,अकोला - राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून १ ते ६ जून या सहा दिवसांत अकोला जिल्ह्यात बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवाला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत यशस्वी केला आहे.''शेतकऱ्यांच बियाणं शेतकऱ्यांसाठी'' या संकल्पनेतून अकोल्यात बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आला. ' शेतकरी इन कंपनी आउट'' अस ब्रीदवाक्य या महोत्सवाचे ठेवण्यात आले होते. १ जून ते ६ जून पर्यंत या सहा दिवस सुरू असणाऱ्या या महोत्सवात जिल्ह्यातील 500 हुन अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

यंदा महाबीज तर्फे बियाण्यांचे भाव वाढवण्यात आले आहे त्या पाठोपाठ खाजगी कंपन्यांनीही बियाण्याचे भाव वाढवले आहे.बाजारात खाजगी कंपन्यांच्या वाढलेल्या बियाण्यांच्या किंमतीमुळे शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली होती. तसेच बोगस बियाण्यांच्या सुळसुळाटमुळे शेतकऱ्यांना हंगाम वाया जात आहे. शेतकऱ्यांची लुट टाळण्याकरिता शेतकऱ्यांनी तयार केलेले शुध्द व उत्कृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांनाच अत्यंत वाजवी दरात मिळावे यासाठी अकोला जिल्ह्यातील सातही कृषी उत्पन्न बाजार समितीने मिळुन बियाणे महोत्सवाचे आयोजन केले होते. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव राज्यात प्रथमच सुरू करण्यात आलं आहे.

जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांनी घेतला सहभाग..
अकोला येथे ११३, बार्शीटाकळी येथे १५०, मुर्तिजापूर येथे ९२, पातुर येथे ७६, बाळापूर येथे १२०, तेल्हारा येथे १५०, अकोट येथे १२५ असे एकूण ८२६ शेतकरी तर जिल्ह्यात एकूण २२ शेतकरी कंपन्या अशा एकूण ८४८ जणांनी नोंदणी केली आहे. या सर्व शेतकऱ्यांना बियाणे विक्रीसाठी २८४ स्टॉल्स उपलब्ध करुन देण्यात आले होते. या महोत्सवात सोयाबीन, तुर, उडीद, मूग,कांदा, भाजीपाला पिके इ. बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

महोत्सवात पाच दिवसांत झाली कोट्यवधी रुपयांची उलाढाल...
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ५ जून पर्यंत २३ कोटी ६८ लाख ७ हजाराची आर्थिक उलाढाल झाली असून १६६७९.५० क्विंटल बियाण्याची शेतकऱ्यांनी बुकिंग केली असून ८२१६.५० क्विंटल बियाण्यांची विक्री करण्यात आली आहे. यावेळी सर्वाधिक विक्री सोयाबीन बियाण्याची झाली आहे. यंदा बाजारात महाबीज तर्फे केवळ ४६०० क्विंटल सोयाबीन बियाणं पुरविण्यात आलं आहे.महोत्सवात ५ जूनपर्यंत सर्वाधिक बियाण्याची विक्री आणि बुकिंग बार्शीटाकली तालुक्यात झाली आहे..

५ जूनपर्यंत कोणत्या तालुक्यात किती विक्री ,कितीची उलाढाल..?

१) अकोला -  ३८९७.५० क्विंटल बियाण्याची बुकिंग , १५४३.७५ क्विंटल स्टॉलवरून विक्री, तर ५०५.७० लाखांची आर्थिक उलाढाल..

२) बार्शीटाकली -  ५८५५.०० क्विंटल बियाण्याची बुकिंग , ३२४० क्विंटल स्टॉलवरून विक्री, तर ६८४.८४ लाखांची आर्थिक उलाढाल..

३) मूर्तिजापूर -  १३४५ क्विंटल बियाण्याची बुकिंग , ६२५.२५ क्विंटल स्टॉलवरून विक्री, तर १९७.०३ लाखांची आर्थिक उलाढाल..

४) पातूर -  १६९२ क्विंटल बियाण्याची बुकिंग , ८८० क्विंटल स्टॉलवरून विक्री, तर २८३.५० लाखांची आर्थिक उलाढाल..

५) बाळापूर - ९१२ क्विंटल बियाण्याची बुकिंग , ३३१.५० क्विंटल स्टॉलवरून विक्री, तर १२४ लाखांची आर्थिक उलाढाल..

६) तेल्हारा - १८८९.५० क्विंटल बियाण्याची बुकिंग , ११७७.२५ क्विंटल स्टॉलवरून विक्री, तर ३०६.१८ लाखांची आर्थिक उलाढाल..

७) अकोट - १०८७.५० क्विंटल बियाण्याची बुकिंग , ४२३.७५ क्विंटल स्टॉलवरून विक्री, तर १५७.२७ लाखांची आर्थिक उलाढाल..

मात्र पेरणी योग्य पाऊस पडल्या शिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असा सल्ला जिल्हा कृषी अधिकारी डॉ. कांताअप्पा खोत यांनी दिला आहे.