वाढदिवसाच्या मध्यरात्री PUBG च्या नादात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू; मित्राला पार्टी देण्यासाठी..

17 Year Old Died On Birthday Night: आपल्या कुटुंबाबरोबर वाढदिवस साजरा केल्यानंतर तो मित्राला पार्टी देण्यासाठी मध्यरात्र उलटून गेल्यावर घराबाहेर पडला होता. मात्र तो पुन्हा घरी परतलाच नाही.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 13, 2024, 09:26 AM IST
वाढदिवसाच्या मध्यरात्री PUBG च्या नादात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू; मित्राला पार्टी देण्यासाठी.. title=
नागपूरमधील धक्कादायक घटना

17 Year Old Died On Birthday Night: नागपूरमध्ये एका धक्कादायक आणि तितक्याच विचित्र अपघातामध्ये 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. वाढदिवसानिमित्त मित्रांना पार्टी देण्यासाठी गेला असताना हा अपघात घडला. पब्जी खेळणं या मुलाच्या जीवावर बेतलं आहे. रात्री खड्ड्यात पडलेल्या या तरुणाचा मृतदेह आज सकाळी बाहेर काढण्यात आला.

कुटुंबाबरोबर वाढदिवस साजरा केल्यानंतर घराबाहेर पडला

समोर आलेल्या माहितीनुसार, मयत मुलाचं नाव पुलकीत शहदादपुरी असं आहे. 17 वर्षीय पुलकीत हा 11 व्या इयत्तेतमध्ये शिकत होता. 12 जून रोजी पुलकीतचा वाढदिवस होता. रात्री कुटुंबियांबरोबर वाढदिवस साजरा केल्यानंतर तो मध्यरात्र उलटून गेल्यावर मित्राला पार्टी देण्यासाठी घराबाहेर पडला होता. 

दुकानं बंद असल्याने अंबाझरी तलावाजवळ गेला

मध्यरात्री पब्जी खेळताना अंबाझरी तलावाच्या पंप हाऊसच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू, वाढदिवसाशी पार्टी देण्यासाठी पडला होता बाहेर. मात्र मध्यरात्रीनंतर जवळपास सर्वच खाद्यपदार्थांची दुकानं बंद असल्याने पुलकीत आणि त्याचा मित्र अंबाझरी तलावावरील पंप हाऊसजवळ जाऊन पब्जी खेळत बसले. त्यावेळी रात्रीच्या अंधारात पब्जी खेळताना मागे असलेल्या पंप हाऊसजवळच्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने पुलकीत खड्ड्यात पडला. 

अनेकदा आवाज देऊनही प्रतिसाद नाही

अचानक पुतकित दिसेनासा झाल्यानंतर त्याच्या मित्राला तो खड्ड्यात पडल्याचं लक्षात आलं. त्याने खड्ड्यात वाकून पुलकीतला आवाज दिला. मात्र अनेकदा आवाज देऊन पुलकीतने प्रतिसाद न मिळाल्याने मित्राने घाबरून कुटुंबियांना फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली.

अखेर पोलिसांना माहिती देण्यात आली

कुटुंबियांपैकी काही जणांनी घटास्थळी धाव घेतली. मात्र रात्रीच्या अंधारात त्यांनाही फारसं काही करता आलं नाही. अखेर पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं. आज सकाळी या पंपहाऊस जवळच्या खड्ड्यामधून पोलीस, अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शिडी लावून खड्ड्यात प्रवेश आणि त्यानंतर पुलकीतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. बराच वेळ पाण्यात राहिल्याने पुलकीतचा मृतदेह दोरखंडांच्या सहाय्याने खेचून वर काढण्यात आला. वाढदिवसाच्या दिवशीच पब्जीच्या नादात 17 वर्षीय तरुणाने प्राण गमावल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.