महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंता वाढवणारा आहे. आज राज्यात १० हजार २१६ व्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २० लाख ५५ हजारांवर पोहोचली आहे. आज राज्यात कोरोनामुळे ५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे.
मात्र रुग्ण वाढत असले, तरी राज्यातील कोरोना रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यांच्या दरम्यानच आहे. त्यामुळे ही एक दिलासादायक बाब म्हणता येईल.
मुंबईतही आज १ हजार १७३ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. पण अॅक्टीव्ह रुग्णांचा विचार केला, तर मुंबईपेक्षा पुण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या अधिक आहे. मुंबईत ९ हजार ५५ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत, तर तीच संख्या पुण्यात १८ हजाराहून जास्त आहे. एकंदरीतच राज्याचा विचार केला तर पुण्यातच अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यापाठोपाठ नागपूरचा क्रमांक लागतो. नागपूरमध्ये अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ११ हजार ५५२ वर पोहोचली आहे.
पुणे शहरात आज नव्याने ८३० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ०६ हजार ३८३ इतकी झाली आहे.