शेतकऱ्यांच देशभरात १० दिवसांचं गाव बंद आंदोलन

मुंबई : राष्ट्रीय किसान महासंघानं आजपासून देशभरात १० दिवसांचं गाव बंद आंदोलन पुकारले आहे. या १० दिवसात गावामधून शहरांमध्ये येणारी फळ, भाजीपाला आणि दूध यासारख्या जीवनावश्यक गोष्टींच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. इंदोरमध्ये टोमॅटोचे दर ६० रुपयांच्या घरात पोहचले आहेत. 

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची प्रमुख मागणी आहे. दीड पट हमीभावाच्या मागणीसाठी किसान संघटनांनी वर्षभरापूर्वी आंदोलन केलं.त्यात मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये पोलिसांच्या गोळीबारात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्याला येत्या ६ तारखेला एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्याविरोधात मंदसौरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. देशभरातल्या २२ राज्यांमध्ये किसान संघटनांनी संप पुकारलेला असला तरी त्याचं केंद्र  मध्यप्रदेशात असणार आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि गुजरातमध्येही संपाचा प्रभाव बघायला मिळण्याची शक्यताय. 

दूधाचा टँकर रिकामा करून आंदोलनामुळे सुरूवात 

देशभरातल्या शेतकऱ्यांनी आज सरकारच्या वेळकाढू धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन सुरु केलं आहे. जागतिक दूध दिवसाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत पुणे-नाशिक महामार्गावर दुधाचा टँकर रिकामा करण्यात आला. संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी सरकारी धोरणाचा तीव्र निषेध केला. संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालास उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता. यासंदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्ष उलटल्यानंतरही पूर्तता न झाल्याने राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती जनआंदोलन, आणि किसान एकता मंचाने पुकारलेल्या संपामध्ये येवला तालुक्यातील धुळगाव व पाटोदा येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध ओतून सरकारचा निषेध केला.

प्रहार संघटनेच्या वतीने आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील   निमगांव केतकी  गोतोंडी  येथे   दुध उत्पादक शेतकऱ्यांनी नागरिकांना दुधाचे मोफत वाटप केले तसेच इंदापूर बारामती महामार्ग  येथे दुधाची वाहतूक करण्यात टॅकर अडवून दुध रस्तावर सोडून देत आंदोलन केले.

आंदोलनाचे सोलापूरमध्ये असे चित्र 

सोलापूरमध्येही शेतकऱ्याचं आंदोलन तापलं आहे. शेतकऱ्यांच्या संपाला एक वर्ष पूर्ण होत असताना मोहोळ तालुक्यातील पालेभाज्या घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या आडवण्यात आल्या होत्या. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उलाढाल ठप्प आहे. पोलिसांच्या हिंसा टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवलाय. किसान सभेनं दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. संपूर्ण राज्यात शेतकरी संप पुकारलेला असताना नाशिक बाजारात मात्र काही शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजारात आणला. किरकोळ विक्रेते आणि काही शेतकरी नेहमीप्रमाणे बाजारात दाखल झाले. तर व्यापारी मात्र बाजारापासून दूर राहिले. गेल्यावर्षी शेतकऱ्यांच्या संपाच्या काळात  एकही शेतकरी बाजाराकडे फिरकला नव्हता. त्यामानानं आज अनेक शेतकरी बाजारात आले होते. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत आंदोलनाला शेतकऱ्यांचा सहभाग कमी असल्याचं दिसतंय. मात्र  मागण्या मान्य होण्याऐवजी गुन्हे दाखल झाले होते. पदरी काही आले नाही म्हणून शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.