'पुणेकरांना प्यायला...'; अजित पवारांचं राज्यातील पाणीटंचाई संदर्भात विधान; धरणांचाही केला उल्लेख

Water Shortage In Dams Of Maharashtra: मराठवाड्यातील धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा आहे. पाणी टंचाईमुळे 389 टँकरने 961 वाड्यांना आणि 366 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 25, 2023, 11:15 AM IST
'पुणेकरांना प्यायला...'; अजित पवारांचं राज्यातील पाणीटंचाई संदर्भात विधान; धरणांचाही केला उल्लेख title=
प्रसारमाध्यमांशी बोलताना नोंदवली प्रतिक्रिया (प्रातिनिधिक फोटो)

Water Shortage In Dams Of Maharashtra: नवीन वर्षामध्ये राज्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील धरणांमध्ये केवळ 63 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमधील पाणीसाठ्यात 20 टक्क्यांची घट झाली आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा आहे. पाणी टंचाईमुळे 389 टँकरने 961 वाड्यांना आणि 366 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. ही आकडेवाडी दिवसागणिक वाढतेय. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यामध्ये पत्रकारांना माहिती दिली.

पाणी प्रश्नावर काय म्हणाले अजित पवार?

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवारांना पाण्याच्या साठ्याबद्दल काय माहिती आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर अजित पवारांनी, "पाण्याचे साठे गेल्यावर्षीच्या तुलनेनं कमी आहेत. केवळ पुण्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तशी स्थिती आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रामध्ये पाण्याची परिस्थिती काय आहे हे आम्हाला कॅबिनेटमध्ये आढाव्यादरम्यान सांगितली जाते. तशापद्धतीने आम्ही, राज्याच्या प्रमुखांनी, देवेंद्रजींनी सूचना केल्या आहेत की पहिलं पिण्यासाठी पाणी शिल्लक ठेवा. त्यानंतर उरलेलं पाणी शेतीला देण्याचं काम करा. पुढच्या वर्षी जुलैच्या शेवटापर्यंत पाणी पुरेल अशापद्धतीने पाणी बाकी ठेवायचं आहे. तशाप्रकारच्या स्पष्ट सूचना जलसंपदा विभागाच्या दिपक कपूर आणि टीमला देण्यात आल्या आहेत. ते त्यांचं नियोजन करत आहेत," असं उत्तर दिलं. 

पुण्यातही स्थिती बिकट

पुढे बोलताना अजित पवार यांनी, "पुण्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची बिकट आहे. खरिपाची पिकं साधारणपणे मार्चमध्ये निघतात तेव्हा पुन्हा कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन एप्रिल, मे, जून, जुलैचं नियोजन कसं करायचं हे ठरवू. बाष्पीभवन कसं होतंय, बाकी पाण्याचा वापर कसा होतोय, त्यावेळेस धरणांची परिस्थिती काय राहते यावर निर्णय अवलंबून आहे. या साऱ्या गोष्टींबरोबरच पुणेकरांना प्यायला पाणी किती लागेल याचा हिशोब करुन आम्हाला बाकीच्या गोष्टी कराव्या लागतील," असं सांगितलं. 

कोणत्या धरणात किती पाणीसाठा शिल्लक आहे?

उजनीमध्ये मागील वर्षी 100 टक्के पाणीसाठी होता तो यंदा 19 टक्के आहे. जायकवाडीमध्ये मागील वर्षीच्या 92 टक्क्यांच्या तुलनेत यंदा 43 टक्के पाणीसाठा आहे. गोसीखुर्दमध्ये मागील वर्षी 58 टक्के पाणीसाठा होता आता तो केवळ 50 टक्के शिल्लक आहे.

केंद्राकडून शेतकऱ्यांना मदत येणार का?

केंद्रीय समितीने पुण्यातल्या 2 तालुक्यांचा पहाणी दौरा केला होता. त्यासंदर्भात मदत मिळण्यासंदर्भात पुढे काही झालं का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी, "मधल्या काळात अवकाळी पाऊस, गारपीट आणि नैसर्गिक संकट शेतकऱ्यांवर आलं. त्यामुळे सोयाबीन, कापूस तसेच अनेक प्रकारच्या फळबागांबरोबरच अनेक प्रकारच्या पिकांचं नुकसान झालं. तातडीने पंचनाम्यांचे आदेश देण्यात आले. काही ठिकाणी मंत्री, पालकमंत्री पहाणी दौऱ्यावर गेले होते. नागपूरला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पहाणीला गेले होते. केंद्रात अमित भाई शाहा या समितीचे प्रमुख आहेत. केंद्राने समिती पाठवून पहाणी केली. त्याचा अहवाल केंद्रीय समितीला जाईल. साधारणपणे अडीच हजार कोटी रुपये त्या कामासाठी आपण मागितले आहेत. केंद्र सरकारने जे नियम ठरवले आहेत त्यात काही मंडळं बसली नाहीत," असं सांगितलं.