सुधा मूर्तींच्या सल्ल्याने मुलांचं करा संगोपन, डॉक्टर-आयएएस होतील मुलं

सुधा मूर्ती यांचे स्वतःचे जीवन एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही. त्यांचे प्रेरणादायी शब्द मुलांना पुढे जाण्याची प्रेरणा देतात. सुधा मूर्ती यांच्या या शब्दांनी मुलांमध्ये आत्मविश्वास आणि धैर्याची कमतरता भासणार नाही.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 16, 2024, 06:59 PM IST
सुधा मूर्तींच्या सल्ल्याने मुलांचं करा संगोपन, डॉक्टर-आयएएस होतील मुलं  title=

Sudha Murthy Motivational Quotes: सुधा मूर्ती या उत्तम लेखिका, यशस्वी उद्योजिका आणि समाजसेविका म्हणून लोकप्रिय आहेत. सुधा मूर्ती यांनी पालकांना अनेकदा मार्गदर्शन केलं आहे. मुलं जन्माला घातल्यावर पालकांची जबाबदारी संपत नाही. तर त्यांच संगोपन करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. अशावेळी सुधा मूर्ती यांनी दिलेल्या टिप्सने मुलांचं संगोपन केल्यास अधिक फायदा होईल. 

सुधा मूर्ती यांनी पालकांना 4 मुद्दे सांगितले आहेत. या मुद्द्यांच्या मदतीने मुलांचे संगोपन केल्यास मुलं मोठ्या पदावर जातील आणि यशस्वी होतील. यासाठी पालकांनी मुलांना सुरुवातीपासूनच खालील मुद्द्यांद्वारे मार्गदर्शन करावे. 

तुमची स्वप्ने कधीही सोडू नका

सुधा मूर्ती म्हणतात की, तुम्ही आयुष्यात कधीही तुमची स्वप्ने सोडू नका. ते पूर्ण करणे कितीही कठीण वाटले तरी चालेल. कष्टाने स्वप्ने साकार होतात. जर मुलांना हे समजले तर ते लहान अपयशांची भीती बाळगणे थांबवतील. त्यामुळे पालकांनी मुलांना लहानपणापासूनच स्वप्नांसाठी प्रयत्न करावेत असे संस्कार करावेत. 

नेहमी शिकत राहा

सुधा मूर्ती म्हणतात की, आपण आपल्या आयुष्यात कधीही शिकणे थांबवू नये. जगात नेहमीच नवनवीन गोष्टी येत असतात. तुम्ही तंत्रज्ञानासोबत जितके अद्ययावत असाल तितके तुमच्यासाठी पुढे जाणे सोपे होईल. शिकण्याने मेंदूला सतर्क राहण्यास मदत होते. पालकांनी देखील शिकण्याच्या प्रयत्नात असावं. जेणेकरुन मुलं ही गोष्ट पालकांकडून शिकतील. 

अपयशाला घाबरू नका

सुधा मूर्ती यांच्या मते, अपयशाला घाबरू नये. तुम्ही तुमच्या अपयशातून शिकून पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत. अपयश हा यशाच्या मार्गाचा एक आवश्यक भाग आहे. मुलांनी त्यांच्या अपयशातून शिकले तर त्यांना आयुष्यात पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अपयश कधीच फुकट जात नाही. कारण तुम्ही यामधून अनेक गोष्टी शिकत असता. 

इतरांना महत्त्व द्या

सुधा मूर्ती म्हणाल्या की, फक्त स्वतःचा विचार करणे योग्य नाही. आपण समाजात राहतो, त्यामुळे इतरांच्या भावना आणि गरजांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. स्वतःपुरता मर्यादित असलेला माणूस कधीच पुढे जाऊ शकत नाही. मुलांनी लहानपणापासूनच इतरांच्या भावनांचा आदर करायला शिकले पाहिजे. एकमेकांना महत्त्व दिल्यामुळे मुलांमध्ये एकोपा निर्माण होतो.