अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा किचनमध्ये असाही होतो वापर, घरातील कामे होतील सोपी

Kitchen Hacks In Marathi: अॅल्युमिनियम फॉइलचा किचनमध्ये विविध कारणांसाठीही केला जाऊ शकतो. हे तुम्हाला माहितीये का, जाणून घ्या

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 15, 2023, 04:48 PM IST
अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा किचनमध्ये असाही होतो वापर, घरातील कामे होतील सोपी title=
Smart Uses Of Aluminium Foil In Household Work kitchen hacks in marathi

Kitchen Hacks In Marathi: चपात्या किंवा पराठे गरम व नरम राहण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ते डब्यात देण्यात येतात. आता प्रत्येक घरात अॅल्युमिनियम फॉइलहा आढळतोच. यावेळी जेवण गरम राहते. लहान मोठ्या फूड स्टॉल आणि ट्रेन, बसमध्ये देण्यात येणारे जेवणही फॉइलमध्ये पॅक करुन देण्यात येते. पण तुम्हाला माहितीये का, जेवण गरम ठेवण्याबरोबरच अॅल्युमिनियम फॉइलचा अनेक कारणांसाठी वापर होतो. किचनमधील अनेक कामे सोप्पी होतात. अॅल्युमिनियम फॉइलच्या जबरदस्त फायद्यांबाबत जाणून घेऊया. 

सुरी किंवा कात्रीला धार येण्याकरिता

सुरी किंवा कात्रीचा जास्त प्रमाणात वापर केल्यानंतर त्याची धार हळहळू कमी होत जाते. अशावेळी जर तुमच्याकडे अॅल्युमिनियम फॉइल असल्यास तुम्ही त्याचा वापर करुन सुरी किंवा कात्रीला धार काढू शकता. यासाठी धार कमी झालेल्या कात्री व सुरीने १० ते 15 वेळा अॅल्युमिनियम फॉइल कापून घ्या. सततच्या घर्षणामुळं कात्रीला चांगली धार येईल. 

झाकण म्हणून वापर

एखाद्या बरणीचे किंवा बाटलीचे झाकण गहाळ झाले असेल तर तुम्ही अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करु शकता. फॉइल पेपर झाकणाच्या शेपमध्ये कापून घ्या आणि बॉटलवर लावून घ्या. 

कपडे इस्री करताना करा वापर 

तुम्हाला कपडे इस्री करायला अजिबात आवडत नाही का? किवा इस्त्री करणे हे फार वेळखाऊ काम वाटत असेल तर तुम्ही अॅल्युमिनियम फॉइलच्या मदतीने हे काम झटक्यात करु शकता. त्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल कपड्यावर ठेवा आणि इस्त्री करा. असं केल्याने कपडे एकाचवेळी दोन्हीकडे इस्री होतो. त्यामुळं तुमचं काम सोप्पं होतं. 

इस्री साफ करण्यासाठी वापरा 

अॅल्युमिनियम फॉइल वापरुन इस्रीची जळालेली प्लेट म्हणजेच स्टीलचा भागदेखील साफ करता येतो. यासाठी सुरुवातीला अॅल्युमिनियम फॉइल कापून त्याचा गोळा करुन घ्या. त्यानंतर इस्त्री जिथे काळी पडली आहे किंवा जळालेली आहे तिथे रगडून घ्या. काही वेळानंतर तुमच्या इस्रीची प्लेट लख्ख चमकेल. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)