Nitin Gadkari Share Recipes Watch Video: देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. शनिवारीच त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. एकीकडे नागपूरमधून गडकरी निवडणूक लढण्यास सज्ज असतानाच दुसरीकडे इंटरनेटवर मात्र काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये गडकरींनी सांगितलेल्या भन्नाट रेसिपी चर्चेत आहेत. इन्स्टाग्रामवरील इन्फ्युएन्सर असलेल्या एका शेफने तर गडकरींनी सांगितलेल्या रेसिपी बनवून त्याचे व्हिडीओ शेअर केले असून हे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.
नितीन गडकरांनी 'कर्ली टेल्स'च्या कामया जानी जानेवारी महिन्यात विशेष मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये गडकरी यांनी त्यांच्या खाण्यासंदर्भातील आवडी-निवडींबद्दल गप्पा मारल्या होत्या. आपल्याला काय आवडतं काय नाही, फेव्हरेट फूड जॉईंट कोणतं आहे इथपासून ते घरच्या घरी कशापद्धतीने आपण आवडीचे पदार्थ तयार करुन खातो इथपर्यंत अनेक गोष्टींबद्दल गडकरींनी मनोमकळेपणा गप्पा मारल्या होत्या.
याच मुलाखतीमध्ये गडकरींनी 2 सोप्या आणि घरच्याघरी झटपट करता येणाऱ्या रेसिपी सांगितल्या होत्या. इन्स्टाग्रामवरील शेफ विनायक नावाच्या अकाऊंटवरुन या रेसिपी पोस्ट करण्यात आल्या आहेत. यापैकी पहिली रेसिपी आहे वांग्याचे काप. मुलाखतीमध्ये गडकरींना, 'वांगं गोल कापायचं. तेल, मोहरी, जिरं आणि थोडं हिंग टाकून त्यात वांग्याचे काप थोडे गरम करुन घ्यायचे. जास्त कुरकुरीत करायचे नाही. त्यानंतर बांधून ठेवलेल्या दह्यामध्ये थोडी फोडणी द्यायची. ज्यात जिरं आणि तिखट मिर्ची असेल. थोडं मीठ टाकायचं. हे फोडणीचं दही त्या वांग्याच्या कापांवर टाकायचं. किती छान डिश तयार होते तुम्ही पाहाच,' अशा शब्दांमध्ये ही रेसिपी सांगितली होती. या रेसिपीचा व्हिडीओ तुम्ही खाली पाहू शकता...
अशाच पद्धतीने नितीन गडकरींनी त्यांना आवडणाऱ्या ठेच्याचीही रेसिपी सांगितली होती. "मी माझा ठेच्याचा फॉर्म्युला तयार केला आहे. कोथिंबीर, मिर्ची, खोबरं आणि त्यावर लसूण बारीक करुन टाकायचा. त्यावर थोडं लिंबू, साखर आणि मीठ टाकायचं आणि त्याचा ठेचा करायचा. मला हा असा ठेचा आवडतो," असं गडकरी म्हणाले होते. गडकरी स्टाईल ठेच्याची रेसिपीही विनायक यांनी शेअर केली आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
हे दोन्ही सहज सोपे आणि अगदी 10 मिनिटांच्या आत होणारे दोन्ही पदार्थ घरी ट्राय करुन बघायला हरकत नाहीत, नाही का?