Coconut Husk Benefits: नारळाच्या वृक्षाला कल्पतरु असं म्हटलं जातं. दैनंदिन जीवनात नारळाचा अनेक कारणांनी आणि अनेक प्रकारे वापर केला जातो. कोवळ्या नारळाचं, शहाळ्याचं पाणी त्वचेच्या सौंदर्यासाठी हातभार लावतं, तर नारळाचं तेल केस आणि त्वचेचं सौंदर्य आणखी उठावदार करण्यास मदत करतात. नारळचा वापर भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. नारळाचं फळ असो किंवा लांबलचक झावळी, प्रत्येक गोष्टीचा वापर हा मानवी जीवनात होताना दिसते.
इतकंच काय, तर नारळाच्या वर असणारं आवरण किंवा नारळाची सालसुद्धा बरीच फायद्याची. या आवरणाच्या वापरानं तुम्ही अनेक अडचणी सहज दूर करू शकता. पण, त्यांचा वापर नेमका कसा करायचा माहितीये?
एखादी जखम झाली, किंवा मुका मार लागला तर तिथं नारळाचं तेल लावलं जातं. इथंच नारळाच्या आवरणाचाही वापर केला जाऊ शकतो. नारळाच्या सालीची पूड करून सूज आलेल्या भागावर लावल्यास सूज कमी होण्यास मदत होते.
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठीसुद्धा नारळाची साल फायद्याची ठरते. नारळाच्या सालीची पूड करून ही पूड खाण्याच्या सोड्यामध्ये मिसळून दातांवर लावल्यास, किंवा दातांवर हलक्या हातानं लावल्यास काही दिवसांतच दातांची नैसर्गिक चमक परत मिळेल असं सांगितलं जातं.
कमी वयातच पांढऱ्या झालेल्या केलांना पुन्हा काळं करण्यासाठी नारळाची साल फायद्याची ठरते. ही साल तव्यावर गरम करून तिची पूड करून नारळाच्याच तेलात मिसळून केसांना लावाली. असं केल्यामुळं केसांना आवश्यक पोषक तत्त्वं मिळून केस गळतीही कमी होते आणि केस काळेही होण्यात मदत होते.
मासिकपाळीदरम्यानही या नारळाच्या सालीची बरीच मदत होते. नारळाची साल जाळून त्याची पूड पाण्य़ात मिसळून प्यायल्यास पाळीदरम्यानच्या वेदनांपासून आराम मिळतो. पण, असं करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. नारळाच्या सालीपासून इतरही अनेक गोष्टी जसं, धूप कप, शोभेच्या वस्तू, लहान झाडू या आणि अशा गोष्टीही तयार केल्या जातात. मागील काही वर्षांमध्ये Organic गोष्टींच्या वापरावर अनेकांनीच भर दिल्यामुळं नवउद्यमींना अर्थार्जनासाठी हा एक नवा आणि तितकाच अनोखा मार्गही मिळताना दिसतोय.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारीत असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही. कृपया कोणत्याही निर्णयाआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )