किती वाजता झोपता? किती वाजता उठता? रात्री किती वेळ मोबाईलवर असता? मोदी सरकारला हवी माहिती

Central Government Survey: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून देशभरामध्ये ही माहिती गोळा करण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी एक विशेष सर्वेक्षण केलं जाणार आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 29, 2023, 08:17 PM IST
किती वाजता झोपता? किती वाजता उठता? रात्री किती वेळ मोबाईलवर असता? मोदी सरकारला हवी माहिती title=
केंद्र सरकारसाठी केलं जाणार हे सर्वेक्षण

Central Government Survey: केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतीयांच्या जीवनमानाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आता तुम्ही सकाळी किता वाजता उठता, दिवसभर काय काय करता, रात्री किती वाजता झोपता यासारखी खासगी माहिती आता राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून देशभरामध्ये ही माहिती गोळा करण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी एक विशेष सर्वेक्षण केलं जाणार आहे. 

नक्की कसं होणार हे सर्वेक्षण?

केंद्र सरकारसाठी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या माध्यमातून गोळा केल्या जाणाऱ्या माहितीची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण तब्बल एक वर्ष चालणार आहे. म्हणजेच 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये हे सर्वेक्षण केलं जणार आहे. सरकारी खात्याने 'वेळेचा उपयोग सर्वेक्षण' असं नाव या विशेष सर्वेक्षणाला दिलं आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत प्रत्येक गावातील आणि मोठ्या शहरातील प्रत्येक वॉर्डमधील 14 कुटुंबांचे सर्वेक्षण केलं जाणार आहे. म्हणजेच हे सर्वेक्षण रॅण्डम सॅम्पलिंग पद्धतीने होणार असल्याची माहिती समोर येत आहे. जनगणेप्रमाणे प्रत्येक घरात जाऊन माहिती गोळा न करता प्रातिनिधिक स्वरुपामध्ये ठराविक घरांमधील व्यक्तींची माहिती गोळा केली जाणार आहे.

पहाटे 4 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 4

निवडलेल्या घरांमध्ये पहाटे 4 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंतच्या काळात त्या कुटुंबामधील प्रत्येक व्यक्ती किती वेळ, कोणते काम करते याची माहिती या सर्वेक्षणादरम्यान गोळा केली जाणार आहे. यामध्ये मोबाईलवर किती वेळ घालवता त्या वेळेचीही नोंदही केली जाणार आहे. म्हणजे अमुक एका कुटुंबातील व्यक्ती त्यांच्या दिवसभरातील वेळेपैकी किती वेळ मोबाईलवर घालवतात याची सुद्धा नोंद ठेवली जाणार आहे. 

या सर्वेक्षणामध्ये नेमकी कोणती माहिती गोळा केली जाणार

खरं तर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाकडून वेगवेगळ्या प्रकारची सर्वेक्षणं केली जातात. आता या विभागाचे सर्वेक्षक प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती स्वत: संकलित करणार आहेत. यामध्ये त्या कुटुंबातील व्यक्तींचं पूर्ण नाव, पत्ता, ते नेमका काय व्यवसाय अथवा नोकरी करतात, संपर्क क्रमांक अशी वैयक्तिक माहिती असणार आहे. सांख्यिक विभागाच्या माध्यमातून गोळा केली जाणारी माहिती ही आकडेवारी स्वरुपात अहवालाच्या माध्यमातून सरकारकडे सुपूर्द केली जाते. या माहितीचा उपयोग सरकारला ध्येय धोरणं निश्चित करण्यासाठी होतो.