Oil To Protect From Mosquitoes: गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, मलेरियाची मोठ्या प्रमाणात साथ आली आहे. अशावेळी लहान मुलांना अधिक जपावे लागते. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे गंभीर आजार हे डासांमुळं होतात. अशावेळी लहान मुलांना बागेत किंवा बाहेर सोडणे पालकांना अयोग्य वाटते. काही पालक मुलांना बाजारात मिळणारे क्रीम लावून बाहेर पाठवतात जेणेकरुन त्यांना डास चावणार नाही. पण लहान मुलांची त्वचा संवेदनशील असते अशा क्रीममुळं त्यांच्या त्वचेवर खाज व पुरळ उठू शकते. जर तुमच्या मुलांनाही मच्छर चावत असतील तर आजच हा आयुर्वेदीक उपाय वापरुन पाहा. बाजारातील क्रीम लावण्याऐवजी मुलांना घरात तयार केलेले हे तेल वापरुन पाहा.
आयुर्वेदिक कंसल्टेंट आणि पंचकर्म स्पेशालिस्ट डॉ. शाश्वत खत्री यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी मुलांना मच्छरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी लिंब आणि कापराच्या तेलाची एक रेसिपी सांगितली आहे. यामुळं मुलांच्या त्वचेवर काही अॅलर्जी व पुरळदेखील येणार नाहीत. जाणून घेऊया हे तेल कसे बनवतात आणि त्याचा फायदा काय.
कडुलिंबाचे आणि नारळाचे तेल त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे. हे तेल शरीराला लावल्यास डास जवळपासही फिरकणार नाहीत. खरंतर, कडुलिंबाच्या तेलात अँटी प्रोटोजॉल गुणधर्म असतात, ज्यांचा एक वेगळाच गंध असतो. या गंधामुळं डास माणसांच्या जवळ येत नाहीत. तसंच, स्पर्शही करु शकत नाहीत.
200 मिली नारळाचे तेल
50 ग्रॅम ताज्या कडुलिंबाची पाने, हवंतर तुम्ही कडुलिंबाची पावडरदेखील वापरु शकता.
डासांना पळवून लावण्यासाठी कडुलिंबाचे तेल खूपच फायदेशीर आहे. बनवण्याची कृतीदेखील खूपच सोप्पी आहे. जाणून घेऊया सविस्तर
सगळ्यात पहिले कढाईत नारळाचे तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर त्यात कडुलिंबाच्या पानाची पेस्ट टाकून मंद आचेवर हे मिश्रण उकळून घ्या. जोपर्यंत तेलाचा रंग हिरवा होत नाही तो पर्यंत हे मिश्रण चांगले शिकवून घ्या. ही प्रक्रिया होण्यास 15-20 मिनिटांचा वेळ लागेल.
तेलाचा रंग हिरवा होऊ लागला की गॅस बंद करा आणि थंड होण्यासाठी ठेवून द्या. तेल थोडे कोमट झाले की गाळणीच्या मदतीने एका काचेच्या बाटलीत ओतून घ्या. तेल थंड झाल्यानंतर त्यात कापराचे 5 तुकडे टाका. काही वेळ तसंच राहिल्यानंतर आपोआप कापराचे तुकडे विरघळण्यास सुरुवात होईल.
कडुलिंब, नारळाचे तेल आणि कापूरपासून बनवलेले हे तेल मुलांना डासांपासून सुरक्षित ठेवेल. त्याचबरोबर या तेलामुळं एक्जिमा,खाज, खरुज यासारख्या समस्याही नष्ट होतील. तसंच, केसांत कोंडा किंवा उवा झाल्या असतील तर हे तेल लावल्यास खूप फायदा होईल. त्वचेसंबंधीत समस्यांसाठी हे तेल खूप चांगला पर्याय आहे.
तुमचं मुलं जेव्हा पण बाहेर खेळण्यासाठी जाईल तेव्हा हे तेल त्याच्या हाता-पायांना व चेहऱ्याला लावा. तसंच, झोपण्याच्या आधी हलक्या हाताने हे तेल मुलांना लावा. लक्षात घ्या की तेल मुलांच्या त्वचेवर घासू नका हलक्या हाताने लावा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)