login करताच येईना; Zerodha डाऊन होताच युजर्स बिथरले, तुमचं ट्रेडिंग व्यवस्थित सुरुय?

Zerodha app : शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील गोष्टींसाठी वापरता असणारं हे अॅप तुम्हीसुद्धा वापरताय? आताच पाहा तुम्हाला अकाऊंट लॉगईन करता येतंय ना...  

सायली पाटील | Updated: Jun 3, 2024, 11:42 AM IST
login करताच येईना; Zerodha डाऊन होताच युजर्स बिथरले, तुमचं ट्रेडिंग व्यवस्थित सुरुय? title=
Zerodha app down due to technical error user face login issues

Zerodha app : लोकसभा निवडणुकीचे निकाल (Loksabha Election Result 2024) जाहीर होण्यााधीपासूनच त्यासाठीची वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. शेअर बाजारातही सोमवारी काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. जिथं निवडणुकीच्या निकालासाठी 24 तासांहूनही कमी वेळ शिल्लक असतानाच एक्झिट पोलनंतर सेन्सेक्समध्ये जवळपास 2500 अंकांची उसळी पाहायला मिळाली. इथं उसळीनंतर शेअर बाजारातील गुंतवणूकीमध्ये अनेक घडामोडी घडत असतानाच गुंतवणुकदारांमध्ये मात्र काहीशी गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. 

सोमवारी सकाळपासूनच देशातील सर्वात मोठ्या शेअर ट्रेडिंग अॅप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Zerodha मध्ये लॉगईन करताना अडचणी येत असल्याचं आणि काहींना लॉगईनच करता येत नसल्याचं पाहायला मिळालं. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं Zerodha चं लॉगईन होत नसल्यामुळं एकच गोंधळ पाहायला मिळाला आणि सोशल मीडियावरही लगेचच गुंतवणुकदारांनी आपल्या अडचणी निदर्शनास आणण्यास सुरुवात केली. 

दरम्यान ही परिस्थिती पाहता कंपनीकडूनही तातडीनं हे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. सदरील Glitch आयएसपी संबंधित तांत्रिक अडचणींमुळं उदभवला असावा अशी शक्यता यावेळी वर्तवण्यात आली. त्याशिवाय तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी Internet connection चा वापर करण्याचाही सल्लाही कंपनीकडून देण्यात आला. 

हेसुद्धा वाचा : 'BJP 225 च्या पुढे जात नाही', ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'एक्झिट पोलमधून शेअर बाजारात..'

 

देशभरातील लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधी Exit Poll ची आकडेवारी समोर आली, ज्यानंतर नव्या आठवड्याची सुरुवात करत ज्यावेळी शेअर बाजार सुरु झाला, तेव्हा गुंतवणुकीसाठी गुंतवणुकदारांची झुंबड पाहायला मिळाली. सेन्सेक्सप्रमाणंच 3 जून रोजी  निफ्टीमध्येही 800हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळाली आणि  सेन्सेक्स, निफ्टी दोन्ही उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचं आढळलं. या साऱ्यामध्ये शेअर बाजारात दणकून ट्रेडिंग झाल्यामुळं झिरोधा आणि ग्रो यांसारखे ट्रेडिंग अॅप मोक्याच्या क्षणी गोंधळले आणि अनेक युजर्सना याचा फटका बसला. 

सेबीकडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड या दोन्ही डिपॉझिटरीसंदर्भातील चर्चा यानिमित्तानं सोशल मीडियावर सुरु झाल्या, जिथं त्यांची सेवा धीम्या गतीनं सुरु असल्याची बाब गुंतवणूकदारांनी तातडीनं समोर आणली.