'भारतीय लष्कर' ही नरेंद्र मोदींची सेना, भाजपचे योगी अडचणीत

'काँग्रेसचे लोक दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालत होते आणि मोदींची सेना आज दहशतवाद्यांना गोळ्या घालत आहेत'

Updated: Apr 2, 2019, 11:23 AM IST
'भारतीय लष्कर' ही नरेंद्र मोदींची सेना, भाजपचे योगी अडचणीत  title=

नवी दिल्ली : भारतीय लष्कर हे ‘नरेंद्र मोदी यांची सेना आहे’ असं वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केलंय. रविवारी रात्री गाझियाबाद इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. दहशतवादाला आळा घालण्यात विरोधक अपयशी ठरल्याची टीका करण्याच्या भरात त्यांनी हे वक्तव्य केलं. परंतु, यामुळे एक नवा वाद उभा राहिलाय. विरोधकांनी आदित्यनाथांवर सेनेचा अपमान केल्याचा आरोप केलाय.

'काँग्रेसचे लोक दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालत होते आणि मोदींची सेना आज दहशतवाद्यांना गोळ्या घालत आहेत. हाच फरक आहे... काँग्रेसचे लोक दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी मसूद अजहरच्या नावासमोर 'जी' वापरतात' असं वादग्रस्त टीप्पणी योगी आदित्यनाथांनी जाहीर सभेत केली होती.

आदित्यनाथांच्या वक्तव्यावर विरोधकांनी कडाडून टीका केलीय. तसंच आदित्यनाथांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलीय. गाझियाबाद जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या सभा संदर्भातील व्हिडिओ क्लिप आणि त्याचं भाषांतर मागवण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आचारसंहितेचं उल्लंघन झालंय अथवा नाही, याची चौकशी होणार आहे. निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना याअगोदरच, लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षा दलाविषयी कोणताही मुद्दा उपस्थित न करण्याचा आणि दुष्प्रचार न करण्याची ताकीद दिली होती.

भारतीय लष्कराचा 'मोदी की सेना' असा उल्लेख करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल निवडणूक आयोगाने आदित्यनाथ यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. देशाच्या सेनादलांची 'मोदी की सेना' अशी संभावना करून आदित्यनाथ यांनी सेना दलाचा अपमानच केला आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरद्वारे केलीय.

सेनेच्या वीरतेचं श्रेय घेणं आणि त्यांना 'मोदी की सेना' म्हणणं हे शहीदांचा आणि जवानांच्या वीरतेचा - त्यागाचा अपमान करण्यासारखं आहे. शिवाय हे निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन असल्याचंही त्यांनी म्हटलंय. २०१९ च्या निवडणुकीत आपला पराभव दिसत असल्यानं भाजप नेते जनादेशाला पायदली तुडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलंय.