'गुजरातच्या जनतेनं ही दोन कामं केली'

गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपला आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 12, 2017, 07:36 PM IST
'गुजरातच्या जनतेनं ही दोन कामं केली' title=

बनासकंठा : गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपला आहे. शेवटच्या दिवसापर्यंत भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी गुजरातमध्ये तळ ठोकून प्रचार केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

गुजरातच्या निवडणुकीमध्ये जनतेनं दोन चांगली कामं केली आहेत. एक म्हणजे मनमोहन सिंग यांनी तोंड उघडलं आणि दुसरं म्हणजे राहुल गांधी मंदिरात जायला शिकले, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला.

संध्याकाळी पाच वाजता गुजरात निवडणुकीचा प्रचार थांबला. शेवटच्या दिवशी मोदी आणि राहुल गांधींनी प्रचार केला. अहमदाबादमधला रोड शो रद्द झाल्यानंतर मोदींनी साबरमती नदीवरून सी प्लेननं अंबाजीच्या दर्शनाला गेले.

राहुल गांधी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जगन्नाथ मंदिरामध्ये पूजा केली. यानंतर राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला. गुजरातमध्ये दलितांवर होत असलेल्या अत्याचारांबाबत मोदी शांत आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली.

१४ डिसेंबरला गुजरातमध्ये उरलेल्या ९३ जागांसाठी मदत होईल. गुजरातमध्ये १९९५ पासून म्हणजेच लागोपाठ २२ वर्ष भाजपची सत्ता आहे. एवढ्या वर्षाच्या सत्तेनंतर तयार झालेल्या विरोधाचा फायदा काँग्रेस घ्यायचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच गुजरातमध्ये निवडणुका होत आहेत.