'सत्तानाट्या'नंतर 'लोकशाहीचा विजय' म्हणत येडियुरप्पांनी मानले अमित शाहांचे आभार

आम्ही कर्नाटकच्या जनतेला स्थिर आणि सक्षम सरकार देऊ, असा विश्वासही बीएस येडियुरप्पा यांनी यावेळी बोलून दाखवलाय.

Updated: Jul 24, 2019, 03:37 PM IST
'सत्तानाट्या'नंतर 'लोकशाहीचा विजय' म्हणत येडियुरप्पांनी मानले अमित शाहांचे आभार title=

बंगळुरू : मंगळवारी कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार सभागृहात बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे कोसळलंय. सत्तेत आल्यानंतर केवळ १४ महिन्यांत काँग्रेस-जेडीएस सरकार पडलंय. त्यानंतर भाजपा आज सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. दरम्यान 'आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा करणार... त्यानंतर राज्यपाल वजूभाई वाला यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करणार' असल्याची माहिती बीएस येडियुरप्पा यांनी दिलीय. त्याचसोबत आम्ही कर्नाटकच्या जनतेला स्थिर आणि सक्षम सरकार देऊ, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय. दरम्यान कुमारस्वामी सरकारवर निशाणा साधत कुमारस्वामी यांचा पराजय हा लोकशाहीचा आणि कर्नाटकच्या जनतेचा विजय असल्याचं वक्तव्य येडियुरप्पा यांनी केलंय. 

येडियुरप्पांनी अमित शाहांचे मानले आभार

उल्लेखनीय म्हणजे, विधानसभेत काँग्रेस - जेडीएस सरकार कोसळल्यानंतर येडियुरप्पा यांनी मंगळवारी अमित शाह यांना एक पत्र लिहिलंय. यामध्ये त्यांनी 'मी तुमचं आणि पक्षाच्या इतर नेत्यांचं विस्तारीत समर्थनासाठी हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो' असं म्हणत आभार मानलेत. बुधवारी बंगळुरूमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी भाजप कर्नाटक अध्यक्ष बी एस येडियुरप्पा यांच्या घराच्या बाहेर मिठाई वाटत आनंद साजरा केला. 

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार अखेर कोसळलंय. विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानात कुमारस्वामी सरकारच्या बाजूनं केवळ ९९ मतं पडली असून विरोधात १०५ मतं पडली. रांगनिहाय आमदारांची मोजणी करून विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आलं. त्यानंतर सरकार अल्पमततात असल्याचं स्पष्ट झालं. कुमारस्वामी  यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला असून त्यांनी तो स्वीकारलाय.