नवी दिल्ली: वाघांसाठी भारत हा जगातील सर्वात सुरक्षित अधिवासांपैकी एक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते सोमवारी जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोदींकडून भारतातील वाघांच्या संख्येचा आढावा घेणारा अहवाल सादर करण्यात आला. दर चार वर्षांना हा अहवाल सादर केला जातो. या अहवालानुसार सध्याच्या घडीला भारतामध्ये तीन हजार वाघ आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी भारत कटिबद्ध आहे. त्यामुळे वाघांसाठी भारत हा जगातील सुरक्षित अधिवासांपैकी एक असल्याचे मोदींनी सांगितले.
भारतातील व्याघ्र संवर्धन मोहीमेची 'एक था टायगर'पासून सुरु झालेली कहाणी 'टायगर जिंदा है' पर्यंत पोहोचली. हा प्रवास एवढ्यावरच थांबला नाही. यंदा जाहीर झालेल्या व्याघ्रगणनेचे आकडे सुखावणारे आहेत. नऊ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या सेंट पीटर्सबर्ग येथे २०२२ पर्यंत भारतातील वाघांची संख्या दुप्पट करण्याचा पण करण्यात आला होता. भारताने हे लक्ष्य चार वर्ष आधीच साध्य केल्याचेही मोदींनी सांगितले.
व्याघ्रगणना अहवालातील माहितीनुसार, देशात वाघांची संख्या २९६७ इतकी आहे. २०१० मध्ये भारतात १७०६ वाघ होते. २०१४ मध्ये वाघांच्या संख्येत वाढ होऊन ती २२२६ इतकी झाली. तर २०१८मध्ये वाघांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊन २९६७ ती इतकी झाली आहे.
PM Narendra Modi: Today, we can proudly say that with nearly 3000 tigers, India is one of the biggest and safest habitats in the world. #InternationalTigerDay pic.twitter.com/Dmf1Xp83N4
— ANI (@ANI) July 29, 2019
गेल्यावेळच्या तुलनेत यंदा वाघांच्या संख्येत ७४१ ने वाढ झाली आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे वाघांची संख्या वाढली तरी त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मृत्यूच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. तर महाराष्ट्रात आजघडीला २३०-२४० इतके वाघ असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.