भारतात भ्रष्टाचार वाढला! जगातील सर्वात भ्रष्ट आणि प्रामाणिक देशांची यादी जाहीर

World Corruption Index 2023 : जगातील सर्वात जास्त भ्रष्ट असणाऱ्या देशांची यादी ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनल या संस्थेने जाहीर केली आहे. या यादीत सलग सहाव्या वर्षी डेन्मार्क हा सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश आहे. तर भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त भ्रष्टाचार होत असल्याचं या यादीनुसार समोर आलं आहे.

राजीव कासले | Updated: Jan 31, 2024, 04:04 PM IST
भारतात भ्रष्टाचार वाढला! जगातील सर्वात भ्रष्ट आणि प्रामाणिक देशांची यादी जाहीर title=

World Corruption Index 2023 : ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनल या संस्थेने जगातील सर्वात भ्रष्ट देशांची यादी जाहीर केली आहे. 2023 या वर्षातील जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक जारी करण्यात आला आहे. 180 देशांचा यात समावेश करण्यात आला असून या यादीत सलग सहाव्या वर्षी डेन्मार्क (Denmark) या देशात सर्वात कमी भ्रष्टाचार (Corruption) नोंदवला गेला आहे. . 180 देशांच्या यादीत दोन तृतीयांश देशांचा निर्देशांक 50 च्या खाली आहे. म्हणजेच दोन तृतीयांश देशांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. त्याच वेळी, अहवालानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचारात सर्वात कमी सुधारणा नोंदवण्यात आली आहे.

अहवालानुसार बहुतांश देशातील सार्वजनिक क्षेत्रात सर्वाधिक भ्रष्टाचार आहे. ही यादी सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या आधारे तयार करण्यात आली आहे. शून्य गुण म्हणजे सर्वात भ्रष्ट आणि 100 गुण म्हणजे सर्वात जास्त प्रामाणिक. 

सर्वात कमी भ्रष्टाचार कोणत्या देशात?
ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनल या संस्थेच्या अहवालानुसार डेन्मार्क या देशात सर्वात कमी भ्रष्टाचार आहे. सलग सहाव्यांदा डेन्मार्कला हा बहुमान मिळाला आहे. न्याय व्यवस्थेतील चांगल्या सुविधांमुळे डेन्मार्कने 100 पैकी सर्वाधिक 90 गुण मिळवले आहेत. तर फिनलँड 87 आणि न्यूझीलंड 85 पॉईंट मिळत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहे.  2023 या वर्षातील टॉप टेनमध्ये नॉर्वे (84), सिंगापुर (83), स्वीडन (82), स्विर्त्झलँड (82), नीदरलँड (79), जर्मनी (78), आणि लक्झमबर्ग (78) या देशांचा समावेश आहे. 

जगातील सर्वात भ्रष्ट देश
या यादीत सर्वात खालच्या क्रमांकावर सोमालिया (11), वेनेजुएला (13), सीरिया (13), दक्षिण सूडान (13), आणि यमन (16) या देशांचा समावेश आहे. हे देशात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. याशिवाय निकारागुआ (17), उत्तर कोरिया (17), हैती (17), इक्वेटोरियल गिनी (17), तुर्कमेनिस्तान (18), आणि लीबिया (18) या देशातही भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली आहे. 

भारत कोणत्या स्थानी?
ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनल या संस्थेच्या अहवालानुसार या यादीत भारत (India) 93 व्या स्थानावर आहे. भारताला 100 पैकी 39 पॉईंट देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 2022 मध्ये भारत 85 व्या स्थानावर होता. त्यावेळी भारताकडे 40 पॉईंट होते. शेजारी देश पाकिस्तान (Pakistan) या यादीत 134 व्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या खात्यात 29 पॉईंट आहेत. तर श्रीलंकेला 34 पॉईंट मिळाले आहेत. अफगाणिस्ता आणि म्यानमारला 20 पॉईट देण्यात आले आहेत. तर चीनला 42 आणि बांगलादेशकडे 24 पॉईंट आहेत. म्हणजे अहवालानुसार चीनमध्ये भारतापेक्षा कमी आणि पाकिस्तानमध्ये भारतापेक्षा जास्त भ्रष्टाचार केला जातो.