नौसेना आणि मोदी सरकारमध्ये का उडतायत खटके?

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय नौसेनला जोरदार टीका केलीय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 12, 2018, 02:43 PM IST
नौसेना आणि मोदी सरकारमध्ये का उडतायत खटके? title=

मुंबई : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय नौसेनला जोरदार टीका केलीय. 

'नौसेनेतील अधिकाऱ्यांची ही धारणा झालीय की ते विकासकार्यांत अडथळा आणू शकतात. नेव्हीच्या लोकांचं काम बॉर्डरवर आहे, त्यांना दक्षिण मुंबईतच का राहायचंय? इथं त्यांना एक इंच जमीनही मिळू देणार नाही' असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसच्या एका कार्यक्रमात गडकरींनी हे विधान केलंय.

का भडकले गडकरी?

त्याचं झालं असं की, गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सी-प्लेनवर स्वार होत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आता हीच सेवा सरकारला सामान्यांसाठीही सुरु करायची इच्छा आहे. त्यासाठी मलबार हिल भागात सी प्लेनच्या टेक ऑफ आणि लॅन्डिंगसाठी जेट्टी तसंच येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांसाठी एक पाण्यात तरंगणारा कॅफे बनवण्याची योजना आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी 'रश्मी डेव्हलमेंट प्रायव्हेट लिमिटेड' नावाची एक खाजगी संस्था हे निर्माण कार्य करणार आहे.

या योजनेला उच्च न्यायालयाकडून मंजुरी मिळाली. परंतु, या सी-प्लेनसाठी दक्षिण मुंबईच्या मलबार हिल भागात जेट्टी बनवण्याची परवानगी नौसेनेनं सुरक्षेचं कारण पुढे करत नाकारली. त्यामुळेच गडकरींचा पारा चढला.

'एक इंचही जमीन देणार नाही'

दुसरी गोष्ट म्हणजे, मलबार हिल भागात महाराष्ट्र सरकार तसंच मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थानही आहे. तसंच याच भागात नौसेनेचं मुख्यालयही आहे. अशा वेळी त्यामुळे सुरक्षा ध्यानात घेऊन जेट्टीला परवानगी नाकारली गेली. त्यामुळे गडकरी भलतेच चिडलेत... 

'आता नौसेला निवासस्थान बनवण्यासाठी दक्षिण मुंबईत एक इंचही जमीन मिळणार नाही... नौसेनेच्या सर्व अधिकाऱ्यांना आलिशान दक्षिण मुंबईच्याच भागात राहण्याची काय गरज आहे? आम्ही तुमचा सन्मान करतो. पण, तुम्हाला पाकिस्तानच्या सीमेवर असायला हवं... जिथून दहशतवादी घुसखोरी करतात... नौसेनेतील प्रत्येकालाच दक्षिण मुंबईतल्या जमिनीवर क्वार्टर आणि फ्लॅट बनवायचेत... ते माझ्याकडे आले होते आणि जमीन मागत होते... मी एक इंचही जमीन देणार नाही. कृपया माझ्याकडे पुन्हा येऊ नका' असं त्यांनी यावेळी म्हटलंय. 

महत्त्वाचं म्हणजे, त्यांनी हे सर्व पश्चिम नौसेनेचे व्हाईस अॅडमिरल गिरीश लुथरा यांच्यासमोर मुंबईतल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात म्हटलंय.