पाटणा: आपली पत्नी आधुनिक जीवनशैलीनुसार (मॉर्डन) वागत नसल्यामुळे तिला तिहेरी तलाक दिल्याचा प्रकार पाटणा शहरात घडला आहे. नूरी फातिमा असे या महिलेचे नाव आहे. तिने याविरोधात महिला आयोगाकडे दाद मागितली आहे. नूरी फातिमा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी २०१५ साली इम्रान मुस्तफा यांच्याशी लग्न केले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतर आम्ही दिल्लीला राहायला गेलो. त्यावेळी नवऱ्याने मला दिल्लीतील आधुनिक जीवनशैलीनुसार वागायला सांगितले. परंतु, मी त्याला नकार दिल्याने नवऱ्याने आपल्या तलाक दिल्याचे नूरी फातिमा यांनी सांगितले.
मी तोकडे कपडे घालावेत, पार्टीला जावे, त्याठिकाणी मद्यसेवन करावे, अशी माझ्या नवऱ्याची अपेक्षा होती. मात्र, या सगळ्याला नकार दिल्याने नवरा मला मारहाण करायचा. अनेक महिने माझा छळ केल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याने मला घरातून निघून जायला सांगितले. मात्र, मी घरातून जाण्यास नकार दिल्याने नवऱ्याने मला तलाक दिला, असा आरोप नूरी फातिमा यांनी केला.
दरम्यान, या सगळ्या प्रकरानंतर नूरी फातिम यांनी राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली. यानंतर महिला आयोगाकडून नूरी फातिमा यांच्या नवऱ्याला नोटीस पाठवण्यात आली आहे.
इम्रान मुस्तफा यांनी आपल्या पत्नीचा छळ केला. जबरदस्तीने दोनवेळा गर्भपात करायला लावला. १ सप्टेंबरला नूरी यांच्या नवऱ्याने त्यांना तलाक दिला होता. त्यामुळे आम्ही इम्रान मुस्तफा यांना नोटीस पाठवली असून लवकरच त्यांच्याशी संपर्कही साधू, असे बिहार महिला आयोगाच्या अध्यक्ष दिलमनी मिश्रा यांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वीच मोदी सरकारने तिहेरी तलाकच्या कुप्रथेचे उच्चाटन करण्यासाठी संसदेत विधेयक मंजूर करवून घेतले होते. यानंतर १ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली होती. त्यामुळे तिहेरी तलाक देणाऱ्या पतीवर फौजदारी कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या गुन्ह्यासाठी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.