Winter Holidays : नवीन वर्षात हुडहुडी वाढणार, उत्तर भारतात कहर, शाळांना सुट्टी

Winter Schools Holidays : थंडीने कहर केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिले आहे. 

Updated: Jan 1, 2023, 03:46 PM IST
Winter Holidays : नवीन वर्षात हुडहुडी वाढणार, उत्तर भारतात कहर, शाळांना सुट्टी title=

Winter Holidays in Schools: उत्तर भारतात थंडीने कहर केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिले आहे. जानेवारीमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. निफाडमध्ये थंडीनं जोर धरला असून, पाराही घसरलाय. कुंदेवाडी इथल्या गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागात 7.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालीय. 

गायब झालेली थंडी पुन्हा परतली

या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहे.नाशिकमध्ये गायब झालेली थंडी पुन्हा परतलीय. शहरातलं तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. या थंडीमुळे नाशिककरांमध्ये हुडहुडी भरली.रायगडमध्ये थंडीचा जोर हळू-हळू वाढत चाललाय. त्यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झालंय. पोलादपूर ते इंदापूरपर्यंत मुंबई गोवा महामार्गावर दाट धुकं पसरलंय. या धुक्यामुळं दृश्यमानता खूपच कमी झालीय. 100 मीटर पर्यंत काहीच दिसत नाही. 

दिल्लीतील सर्व सरकारी शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद

दरम्यान, देशातील अनेक राज्यांतील शाळांमध्ये हिवाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानमधील शाळांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीतील सर्व सरकारी शाळा 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत बंद राहतील. मात्र, या काळात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वर्ग सुरू राहणार आहेत.

तर दुसरीकडे  उत्तर प्रदेशातील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी हिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. मैनपुरी मूलभूत शिक्षण विभागाने 31 डिसेंबर 2022 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत आठवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

बदाऊन, बिजनौर, आग्रा, बरेली, अलिगढ आणि पिलीभीत यासह अनेक जिल्ह्यांमध्ये 28 डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहिल्या. मात्र, मूलभूत शिक्षण संचालनालयाने 29 डिसेंबर रोजी गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये आठवीपर्यंतच्या शाळा 1 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मेरठमध्येही 1 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती.

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. लखनऊमध्ये आठव्या वर्गापर्यंतच्या सर्व शाळा सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु राहतील. अयोध्येत सकाळी 10 ते दुपारी 3.30 पर्यंत शाळा सुरु राहतील. गौतम बुद्ध नगर येथील शाळांच्या वेळा सकाळी 9 वाजल्यापासून बदलण्यात आल्या आहेत. गाझियाबादमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक वर्ग सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होतील.

हरियाणातील सर्व शाळांमध्ये हिवाळी सुट्टी जाहीर

हरियाणातील सर्व शाळांमध्ये 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत हिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, बोर्डाच्या परीक्षा पाहता दहावी आणि बारावीचे वर्ग सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहेत. 16 जानेवारीपासून शाळा पूर्वीप्रमाणेच सुरु होतील. अतिरिक्त वर्ग घेणाऱ्या शिक्षकांना नियमानुसार मोबदल्यात अर्जित रजा मिळेल.

राजस्थानमध्येही 25 डिसेंबर ते 5 जानेवारी हिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बिहार राज्यात पाटणासह अनेक जिल्ह्यांमध्ये 26 ते 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.