नवी दिल्ली : पाकिस्तानला पुन्हा एकदा धडा शिकवण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. राजस्थानच्या सुरतगड एयरबेसवर विंग कमांडर अभिनंदन यांनी रविवारी कार्यभार सांभाळला आहे. आता लवकरच अभिनंदन फायटर प्लेनमध्ये दिसतील. पाकिस्तानवरून परतल्यानंतर सगळ्या प्रक्रिया पूर्ण व्हायला जवळपास दोन महिने लागले, यानंतर अभिनंदन एयरबेसवर पोहोचले. एयरबेसवर पोहोचल्यानंतर वायूसेनेच्या अधिकाऱ्यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचं भव्य स्वागत केलं. आपल्या साथीदारांना पाहून अभिनंदन खुश होते.
पुलवामा हल्ल्यानंतर या हल्ल्याचं चोख प्रतुत्तर देण्यासाठी म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात भारतीय वायुदलाकडून एअरस्ट्राईक करण्यात आला होता. ज्यानंतर भारताच्या या हल्ल्याचं उत्तर म्हणून पाकिस्तानी वायुदलाच्या काही लढाऊ विमानांनी भारताची हवाई हद्द ओलांडली.
पाकिस्तानच्या एफ १६ या विमानांना परतवून लावताना त्यांच्यावर भारताकडूनही हल्लाबोल करण्यात आला. यावेळी विंग कमांडर अभिनंदन हे मिग २१ बायसनची धुरा सांभाळत होते. पाकिस्तानची घुसखोरी परतवून लावण्याच्या त्यांच्या याच प्रयत्नांत वर्थमान यांच्या विमानावरही पाकिस्तानकडून निशाणा साधण्यात आला होता, ज्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत दुखापतग्रस्त अवस्तेत पोहोचले.
पुढे त्यांना पाकिस्तानी सैन्याकडून ताब्यातही घेण्यात आलं. तसंच त्यांना पाकिस्तानमध्ये मारहाण करून जखमीही करण्यात आलं. परिणामी भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये असणाऱ्या तणावग्रस्त वातावरणात आणखी वाढ झाली. पण, भारताकडून होणारा एकंदर दबाव पाहता पाकिस्तानने काही तासांत अभिनंदन वर्थमान यांना भारताकडे सुपूर्द केलं. या संपूर्ण घटनेदरम्यान अभिनंदन वर्थमान पाहता पाहता प्रत्येक देशवासियाच्या अभिमानाचं निमित्त ठरले.