यंदा आम्हाला सत्तास्थापनेसाठी मित्रपक्षांची गरज भासेल- राम माधव

अमित शहा आणि अरूण जेटली यांनी भाजपला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता.

Updated: May 6, 2019, 08:52 PM IST
यंदा आम्हाला सत्तास्थापनेसाठी मित्रपक्षांची गरज भासेल- राम माधव  title=

नवी दिल्ली: भाजपला यंदा सत्तास्थापनेसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) मित्रपक्षांची गरज पडेल, असे वक्तव्य भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी केले. लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना राम माधव यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. यावरून २०१४ प्रमाणे भाजपला एकहाती सत्ता स्थापन करता येणार नाही, याचा अंदाज आल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

राम माधव सोमवारी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपने २७१ जागा जिंकल्या तर आम्हाला आनंद होईल. जेणेकरून आम्ही एनडीएमधील घटकपक्षांच्या साथीने सहज सरकार स्थापन करू, असे राम माधव यांनी म्हटले. मात्र, यापूर्वी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी भाजपला अधिक जागा मिळतील, असा दावा केला होता. मात्र, भाजपला त्यापेक्षा बऱ्याच कमी जागा मिळतील, असे संकेत राम माधव यांच्या वक्तव्यावरून मिळत आहेत. 

या मुलाखतीत राम माधव यांनी उत्तर भारतात भाजपला २०१४ च्या तुलनेत फटका बसेल, हे मान्य केले. मात्र, ईशान्य भारत, ओदिशा आणि पश्चिम बंगालमधून त्याची भरपाई होईल, असेही त्यांनी सांगितले. या निवडणुकीनंतर पुन्हा भाजपची सत्ता आल्यास सरकार विकासाभिमुख धोरणे पुढे सुरूच ठेवेल. तसेच लोकानुनयाच्या नादात सरकार आर्थिक सुधारणांकडे दुर्लक्ष करणार नाही. उत्तर भारतामधील पक्षाचे नुकसान ईशान्य भारतामुळे भरून निघेल. मात्र, प्रस्थापितविरोधी ( अँटी-इन्कम्बन्सी) लाटेमुळे भाजपला गेल्यावेळसारखे यश मिळणार नाही, हे सांगायलाही राम माधव विसरले नाहीत. 

लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाचव्या टप्प्याचे मतदान सोमवारी पार पडले. पाचव्या टप्प्यात देशभरातील ५१ मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली. निवडणुकीचे शेवटचे तीन टप्पे भाजपसाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. २०१४ साली शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये येणाऱ्या २८२ मतदारसंघांपैकी ११६ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे या जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे.