नवी दिल्ली: सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना सोमवारी लैंगिक शोषण प्रकरणात चौकशी समितीने क्लीन चीट दिली. या प्रकरणात रंजन गोगोई यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे समितीने स्पष्ट केले. डिसेंबर २०१८ मध्ये या महिलेला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले होते. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्या राहत्या घरी माझ्यासोबत लैंगिक शोषण केल्याचा दावा संबंधित महिलेने केला होता. याबद्दल १९ एप्रिलला २२ न्यायाधीशांना पत्र लिहून महिलेने याबाबत माहिती दिली. या आरोपांमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, चौकशीला सुरुवात झाल्यानंतर काही दिवसांतच न्याय मिळण्याची अपेक्षा नसल्याचे सांगत चौकशीतून माघार घेतली होती.
The three member in-house committee of the Supreme Court has found no substance in the sexual harassment allegations against Chief Justice of India Ranjan Gogoi. pic.twitter.com/cG4yVB8ViR
— ANI (@ANI) May 6, 2019
चौकशीदरम्यान आपल्या वकिलाला उपस्थित राहण्याची परवानगी नाही. तसेच या चौकशीचे कोणतेही ऑडिओ किंवा व्हीडिओ चित्रीकरण होणार नाही. याशिवाय, या चौकशीदरम्यान महिलेने दिलेल्या जबाबाची प्रतही महिलेला देण्यात येणार नसून चौकशी प्रक्रियेबद्दलही कोणतीही माहिती नसल्याकडे महिलेने लक्ष वेधले होते. तसेच चौकशी समिती माझ्या तक्रारीकडे लैंगिक छळाच्या दृष्टीकोनातून न बघता अत्यंत सामान्य पद्धतीने बघत आहे. एकप्रकारे अशी परिस्थिती निर्माण करुन मला चौकशीतून बाहेर पडण्यासाठी उद्युक्त करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची न्याय आणि समानतेने चौकशी होण्याची गरज महिलेने व्यक्त केली. परिणामी मी चौकशीतून माघार घेत असल्याचे या महिलेने सांगितले होते.