Pulwama Attack : मेजर विभूती धोंडियाल यांची पत्नी लष्कराच्या वाटेवर

पतीप्रमाणेच देशसेवेत रुजू होण्यासाठी त्यांनी उचललं हे पाऊल 

Updated: Feb 20, 2020, 08:12 AM IST
Pulwama Attack : मेजर विभूती धोंडियाल यांची पत्नी लष्कराच्या वाटेवर  title=
मेजर विभूती धोंंडियाल यांना अखेरचा निरोप देतानाचे काही भावनिक क्षण....

मुंबई : साधारण वर्षभरापूर्वी पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढा देताना भारतीय लष्कराच्या मेजर विभूती शंकर धोंडियाल Vibhuti Shankar Dhoundiyal यांना वीरमरण आलं. आणखी तीन जवानांनीही या कारवाईत आपले प्राण गमावले होते. साऱ्या देशाच्या मनाला चटका लावून जाणाऱ्या या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा त्यासंबंधीच्या चर्चांनी लक्ष वेधलं आहे. 

मुळच्या देहरादूनच्या असणाऱ्या मेजर विभूती धोंडियाल यांनी देशासाठी प्राण त्यागले. पण, आपल्या पतीच्या निधनांतर खचून न जाता त्यांची पत्नी निकीता कौल यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. पती, म्हणजेच मेजर विभूती यांनी ज्याप्रमाणे देशाच्या संरक्षाचा वसा उचलला होता, त्याचप्रमाणे आता त्यांच्या पत्नी निकीतासुद्धा भारतीय लष्कराच्या सेवेत रुजू होण्यास सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिवाय त्यांच्या जिद्दी आणि खंबीर वृत्तीलाही दाद दिली जात आहे. 

निकीता कौल यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन दाखवली आहे. आता त्या मेरिट लिस्ट जाहीर होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मुळच्या काश्मीरच्या असणाऱ्या निकीता यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबाकडूनही मोठा पाठिंबा मिळाला आहे. पतीला श्रद्धांजली वाहण्याचा हा पर्याय त्यांनी स्वत: निव़डला असल्याचं निकीता यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. 

साधारण वर्षभरापूर्वी मेजर धोंडियाल यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरुनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. त्यांचं शहीद होण्याचं वृत्त येताच अनेकांच्या काळजात धडकी भरली होती. याच प्रसंगी आपल्या पतीच्या पार्थिवाकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या निकीता कौल यांना पाहूनही सारा देश हळहळला होता.

VIDEO : I Love You म्हणत वीरपत्नीने दिला शहीद पतीला अखेरचा निरोप

त्या प्रसंगी नेमकं काय झालं होतं? 

जैशकडून घडवण्यात आलेल्या आत्मघाती Pulwama Attack पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराकडून काही महत्त्वाची पावलं उचलली गेली होती. ज्यामध्ये मेजर धोंडियाल हे 'सर्च एँड डिस्ट्रॉय' या टीमचा भाग होते. मेजर धोंडियाल आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या वीर जवानांनी या मोहिमेत दहशतवाद्यांचा खात्मा केला. पण, यामध्ये त्यांना त्यांचे प्राणही गमवावे लागले होते.