Wife Attends Husband Marriage: आपल्या साथीदाराचं आपल्याशिवाय अजूनही इतर कोणावर प्रेम आहे असं तुम्हाला कळालं तर साहजिकपणे नाराजी, संताप अशीच तुमची प्रतिक्रिया असेल. त्यातही जर तुमचं लग्न झालं असेल आणि अफेअर सुरु असेल तर मात्र ही चूक अक्षम्य असते. पण जर एखाद्या पत्नीने आपल्याच पतीचं दुसरं लग्न लावून दिलं असल्याचं तुम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास बसेल का? नाही ना...पण खरंच असं घडलं असून स्वत: पत्नी या लग्नासाठी हजर होती. आंध्र प्रदेशात ही घटना घडली आहे.
आंध्र प्रदेशात एक लग्न पार पडलं असता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण या लग्नात नवरदेवाची पत्नीही हजर होती. इतकंच नाही तर लग्न झाल्यावर आपण तिघं एकत्र राहण्याचंही त्यांनी ठरवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेंट क्रिएटर असणाऱ्या कल्याण याचं काही वर्षांपूर्वी विमलाशी लग्न झालं होतं. मित्र असणारे कल्याण आणि विमला एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्न झाल्यानंतर गोष्टी बदलू लागल्या. कल्याण हा फार विचित्र वागत असून ते सतत बदलत असल्याचं विमला हिला जाणवत होतं.
याचदरम्यान नित्या नावाची एक तरुणी विशाखापट्टणम येथून त्यांच्या परिसरात राहण्यासाठी आली होती. नित्या आणि कल्याण एकमेकांना आधीपासून ओळखत होते. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पण नंतर त्यांनी आपापला मार्ग निवडला होता. मात्र नित्याला कल्याण आता विवाहित आहे याची कल्पना नव्हती.
नित्याला कल्याणशी लग्न करायचं होतं. तो विवाहित असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिने विमलाची गाठ घेतली आणि आपल्याला कल्याणशी लग्न करण्यास परवानगी मागितली. सुरुवातीला विमला तयार नव्हती. पण वारंवार विनवण्या करण्यात आल्यानंतर अखेर तिने संमती दिली. इतकंच नाही तर तिने या लग्नाला हजेरीही लावली.
कल्याण आणि नित्या यांचा पारंपारिक पद्धतीने विवाह पार पडला. लग्नानंतर तिघांनी एकत्र फोटोही काढले. यानंतर आता तिघेही एकाच घऱात राहणार आहेत.