रेल्वेच्या शेवटच्या डब्ब्यामागे 'X'असं चिन्ह का असतं, माहितीये?

अनेकदा राज्यात किंवा राज्याबाहेर जाण्यासाठी रेल्वे (Railway) प्रवास केला जातो.

Updated: Jul 4, 2021, 08:08 PM IST
 रेल्वेच्या शेवटच्या डब्ब्यामागे 'X'असं चिन्ह का असतं, माहितीये?  title=

मुंबई : आपल्यापैकी अनेकजण दररोज रेल्वेने प्रवास करतात. अनेकदा राज्यात किंवा राज्याबाहेर जाण्यासाठी रेल्वे प्रवास केला जातो. प्रवासादरम्यान आपल्याला रेल्वेत अनेक सांकेतिक चिन्हं (Code) पाहायला मिळतात. पण त्याबाबत आपल्याला माहिती नसल्याने किंवा वेळ नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करतो. पण या सांकेतिक चिन्हांचा अर्थ मोठा सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असतो. आतापर्यंत आपल्यापैकी अनेकांनी रेल्वेच्या शेवटच्या डब्ब्यामागे मोठ्या अक्षरात पिवळ्या रंगाची एक्सची फुल्ली पाहिली असेल. पण याचा नेमका अर्थ अनेकांना ठावूक नाही. याबाबत आपण माहिती करुन घेऊयात. (Why is the mark of X made on the last compartment of the train)

रेल्वेमागे दिसणाऱ्या या मोठ्या अक्षरातील एक्स सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. ही एक्सची खूण रेल्वे डब्ब्याची तपासणी करण्यासाठी बनवण्यात आलेला असतो. रेल्वे अधिकाऱ्याला तपासणी दरम्यान डब्ब्यामागे हे चिन्ह दिसलं नाही, तर रेल्वेचा डब्बा  मागे राहिल्याचा इशारा मिळतो. त्यानंतर रेल्वे विभाग तातडीने हालचाली करतं. प्रवाशी म्हणून तुम्ही ही प्रवासादरम्यान रेल्वेच्या शेवटच्या डब्ब्यामागे हा मोठा एक्स आहे की नाही, याबाबतची खात्री करु शकता.  

LV म्हणजे काय? 

या मोठ्या एक्स चिन्हाखाली लहान अक्षरात LV असं लिहिलेलं असतं. LVचं पूर्ण स्वरुप last vehicle म्हणजेच शेवटचा डब्बा. रेल्वेचा शेवटचा डब्बा ओळखण्यासाठी   LVचा वापर केला जातो.  प्रवासादरम्यान जर तुम्हाला  एक्स किंवा एलव्ही यांपैकी दोन्ही चिन्ह न दिसल्यास तुम्ही अडचणीत असल्याचं समजून जा. असा प्रकार लक्षात येताच तुम्ही रेल्वे विभागाला याबाबत सूचित करु शकता.  

फक्त पॅसेंजर रेल्वेतच असतात सांकेतिक चिन्ह

विशेष म्हणजे हे सांकेतिक चिन्ह पॅसेंजर रेल्वेवरच असतं. मालगाडीचा शेवटचा डब्बा हा गार्डचा असतो. रेल्वे नियमांनुसार, हे सांकेतिक चिन्ह सर्व पॅसेंजर रेल्वेच्या शेवटच्या डब्ब्यावर असणं  बंधनकारक असतं. याशिवाय लाल दिव्याचाही वापर केला जातो. हा लाल दिवा नेहमीच पेटत असतो, ज्यातून रेल्वेचा शेवटचा डब्बा असल्याचं निदर्शनास आणून दिलं जातं.  

संबंधित बातम्या : 

एक्सप्रेसच्या तिकीटावर कुटुंबातील सदस्यही करु शकतात प्रवास, फक्त इतकं काम करावं लागेल