IPS पद नाकारलं, IAS च व्हायचंय...! कोण आहे UPSC 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव?

UPSC Civil Services Final Result 2023 : मागल्या अटेम्पटला आयपीएल झाला पण आयएएस व्हायचं होतं, पुन्हा प्रयत्न केला अन् पटकवला ऑल इंडिया रँक वन...!

सौरभ तळेकर | Updated: Apr 16, 2024, 04:49 PM IST
IPS पद नाकारलं, IAS च व्हायचंय...! कोण आहे UPSC 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव? title=
UPSC 2023 Civil Services Final Result Topper aditya srivastava

UPSC 2023 Topper aditya srivastava : लाखो विद्यार्थ्यांना प्रतिक्षा असलेला केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल (UPSC Civil Services Final Result) जाहीर झाला असून आदित्य श्रीवास्तव (Aditya srivastava) हा देशात पहिला आला आहे, तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आलाय. तसेच अनन्या रेड्डी हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर पीके सिद्धार्थ राजकुमार यादव याचा चौथी रँक मिळाली आहे. युपीएससीच्या मुळ वेबसाईटवर म्हणजेच upsc.gov.in वर निकाल पहायला मिळू शकतो. यावर्षी, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा, गट 'अ' आणि गट 'ब' मध्ये नियुक्तीसाठी एकूण 1016 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, सध्या युपीएससीचा टॉपर आदित्य श्रीवास्तव याचं कौतूक होत आहे. आदित्य श्रीवास्तक आहे तरी कोण? जाणून घेऊया..

युपीएससी 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव हा लखनऊचा आहे. प्रथमिक शिक्षण लखनऊमधून झाल्यानंतर आदित्यने आयआयटी कानपूरमधून उच्च शिक्षणात बीटेक केलं. त्यानंतर त्याने आयआयटी कानपूरमधून एमटेक देखील लगेच पूर्ण केलं. शिक्षण झाल्यानंतर त्याने कॉर्पोरेटमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. कॉर्पोरेटमधली नोकरी आदित्यला रुचत नव्हती म्हणून त्याने 15 महिने काम केल्यानंतर कॉर्पोरेटमध्ये नोकरीचा राजीनामा दिला अन् युपीएससीची तयारी सुरू केली. 

आदित्यला लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड होती. मात्र, त्याने युपीएससी करण्याचा ठाम निश्चय केला. सतत मेहनत, वेळेचे व्यवस्थापन आणि सकारात्मक मानसिकता या तीन गोष्टींवर भर देत आदित्यने युपीएससी क्रॅक केली. कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली असल्याने त्याला सपोर्ट मिळाला अन् त्याने लक्ष विचलित होऊ न देता, अभ्यासावर लक्ष दिलं. आदित्यचे वडील अजय श्रीवास्तव कॅगमध्ये ऑडिटर आहेत. तर आई हाऊस वाईफ आहे. लखनऊच्या आयआयएम रोडवर असलेल्या एडिलको सिटीमध्ये आदित्यचे घर आहे.

दरम्यान, आदित्य गेल्या वर्षी दुसरी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर त्यांची रँक 226 होती. त्यानंतर त्याला आयपीएस पद मिळालं होतं. मात्र, आयएस होण्याची त्याची इच्छा असल्याने पुन्हा युपीएससीचा अटेम्पट दिला अन् त्याला तिसऱ्यांदा प्रयत्नात प्रथम क्रमांक मिळाला आहे. मेहनत, चिकाटी आणि निश्चय याच्या जोरावर आदित्यने आपला प्रवास सुरू केला होता. आता त्याने आपलं ध्येय गाठलं आहे. स्वत:वर विश्वास असेल तर मोठे निर्णय घेता येतात हे आदित्यच्या कहाणीतून पहायला मिळतंय.