नवी दिल्ली: भारतीय भूमीवर आजवर अनेक शूरवीरांनी जन्म घेतला. या शूरवीरांची महती अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. अशाच एका भारतीय वंशाच्या महिलेची सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरु आहे. या महिलेचे नाव नूर इनायत खान असे आहे. नूर इनायत खान या ब्रिटीशांसाठी हेरगिरी करायच्या. त्या टिपू सुलतानाच्या वंशजांपैकी एक होत्या.
सध्या ब्रिटनमध्ये एक मोहीम चालवली जात आहे. २०२० साली छापण्यात येणाऱ्या ५० पौंडाच्या नोटेवर नूर इनायत खान यांची प्रतिमा असावी, अशी या मोहिमेतील कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यासाठी सध्या देशभरात स्वाक्षरी मोहीम सुरु आहे.
कोण होत्या नूर इनायत खान?
इंग्लंडच्या हेरखात्यात असलेल्या नूर यांनी फ्रान्समध्ये असताना हिटलरबद्दलची गुप्त माहिती गोळा करण्याचे काम केले होते. आपली गुप्त माहिती शत्रूपर्यंत पोहोचत असल्यामुळे हिटलर हैराण झाला होता. हेरगिरी करताना पकडल्या गेल्यानंतरही त्यांनी ब्रिटनविरोधात शेवटपर्यंत तोंड उघडले नाही. अखेर कैदेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या शौर्यासाठी ब्रिटनकडून नूर इनायत खान यांचा मरणोत्तर जॉर्ज क्रॉस पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.
हेरगिरी आणि देशनिष्ठा
दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी नूर इनायत खान हेर म्हणून फ्रान्समध्ये गेल्या. या काळात जर्मनीने ब्रिटिशांच्या अनेक गुप्तहेरांना ठार मारले. मात्र, या परिस्थितीमध्येही नूर फ्रान्समध्ये जीव धोक्यात घालून काम करत राहिल्या. अखेर त्या जर्मनीच्या हाती लागल्या. यावेळी जर्मन लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून इंग्लंडविषयीची गुप्त माहिती काढून घेण्याच प्रयत्न केला. मात्र, देशभक्त असलेल्या नूर यांनी शेवटपर्यंत तोंडातून एकही शब्द काढला नाही. अखेर दहा महिन्यांच्या छळानंतर नाझी सैनिकांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली.