Risk Of Co-Sleeping : मुलांच्या प्रेमापोटी आणि काळजीपोटी सर्वच पालक कायमच मुलांसोबत झोपतात. मुलांना देखील पालकांसोबतच झोपायला आवडते. अनेक मुलांना देखील पालकांशिवाय झोप येत नाही. मुलांच्या लहान वयात अशा पद्धतीने एकत्र झोपणे योग्य आहे. पण एका विशिष्ट वेळेनंतर पालकांनी मुलांसोबत झोपणे घातक ठरू शकते. तुम्हाला माहित आहे का कि, कोणत्या वयानंतर पालक आणि मुलांनी एकत्र झोपणे टाळले पाहिजे. आपण या आर्टिकलद्वारे यामागचं कारण समजून घेणार आहोत.
मुलं जस जशी मोठी होत जातात तसे त्यांच्या शरीरात अनेक बदल होत जातात. या दरम्यान मुलांची आवड-निवड देखील बदलते. मुलांमध्ये होणारे शारिरीक आणि मानसिक बदल दोन्ही पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे. मुलांना 5 ते 6 वर्षांनंतर वेगळं झोपवायला सुरूवात करायला काहीच हरकत नाही. अनेक मुलांना त्यांच्या शरीरात होणारा बदल कळत नाही पण ते लाजतात. अशावेळी त्यांना नीट समजावून सांगणे अत्यंत गरजेचे ठरते.
मुलांसोबत न झोपण्याची अनेक कारणे आहेत. NCBI ने दिलेल्या रिपोर्टनुसार, मुलं पालकांसोबत झोपली तर त्यांना थकवा, अशक्तपणा, लठ्ठपणा, डिप्रेशन यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. यानंतर मुलं वयात यायला सुरूवात होते. यामुळे पालक आणि मुलांमध्ये एक विशिष्ट अंतर निर्माण होते. असं असताना त्यांचे मानसिक आरोग्य सांभाळणे देखील तितकेच महत्त्वाचे असते.
प्री-प्युबर्टी अगोदरच मुलांना पालकांनी सोबत झोपवणे टाळावे कारण मुलांचे वयात येण्याचा हाच काळ असतो. आता मुली 8 ते 13 वयापर्यंत वयात येतात तर मुलं 9 ते 14 या वयापर्यंत मोठे होतात. तर या अगोदरच तुम्ही मुलांना वेगळं झोपायची सवय लावली तर नक्कीच फायदा होतो. मुलांना जर ही गोष्ट स्वतःहून वाटत असेल तर या विचाराचं स्वागतच करा. पण जर तसं वाटत नसेल तर तुम्ही मुलांना ही गोष्ट आवर्जून सांगा. कारण हा बदल अत्यंत महत्वाचा आहे.
पालक हे दोघेही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहेत. यांचा स्वतःचा असा Me Time असायला हवा. जो अनेक पालकांना फक्त झोपताना मिळतो. अशावेळी पालकांची होणारी चर्चा मुलांच्या कानी पडते. हे मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीकोनातून अजिबातच चांगले नाही. मुलांना जसा स्पेस द्यायला हवा तसा पालकांनी देखील स्वतःसाठी वेळ द्या.