हलाल सर्टिफाइड चहा म्हणजे काय? चहावरुन भारतीय रेल्वे स्टाफ आणि प्रवाशात जोरदार हंगामा

What is Halal Tea: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, या व्हिडिओत रेल्वे स्टाफ आणि एका प्रवाशात चहावरुन जोरदार भांडण झाल्याचं दिसतंय. याला कारण आहे प्रवाशाला रेल्वेत देण्यात आलेला हलाल सर्टिफाइड चहा

राजीव कासले | Updated: Jul 24, 2023, 07:56 PM IST
हलाल सर्टिफाइड चहा म्हणजे काय? चहावरुन भारतीय रेल्वे स्टाफ आणि प्रवाशात जोरदार हंगामा title=

Indian Railway Viral Video: भारतीय रेल्वेतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन (Video) सध्या जोरदार वाद सुरु आहे. रेल्वेत प्रवाशाला देण्यात आलेल्या हलाल सर्टिफाइड (Halal Certified) चहावरुन कर्मचारी आणि प्रवाशात वाद रंगला. प्रवाशाने 'हलाल' या शब्दाला आक्षेप घेत कर्मचाऱ्यांना याचा जाब विचारला. तर कर्मचाऱ्यांनी हा चहा शुद्ध शाकाहारी असल्याचं या प्रवाशाला समजावलं. पण श्रावण महिन्यात प्रवाशांना हा चहा का दिला जातोय असा प्रतिप्रश्न प्रवाशाने केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हलाल म्हणजे काय?
वास्तविक हलाल हा एक अरबी शब्द आहे. हलालचा अर्थ शुद्ध किंवा वैध. इस्लामिक मान्यतेनुसार हलाल या शब्दाचा वापर केवळ खाण्यायोग्य जनावरांना मारण्यासाठीच वापरला जात नाही, तर उत्पादन प्रक्रियेसाठी देखील वापरला जातो. हलाल ही पद्धत मुस्लिम धर्मीयांमध्ये आहे. एका विशिष्ट प्रकारे प्राण्याची कत्तल केली जाते. ज्याला इस्लाममध्ये योग्य मानलं जातं. हलाल पद्धतीत प्राणी कापताना त्याच्या मानेची विशिष्ट शीर कापली जाते. यावेळी दुवा पढली जाते. सर्व रक्त वाहून गेल्यानंतर मग कापण्याची पुढील प्रक्रिया केली जाते. याला इस्लाममध्ये हलाल पद्धत मानली जाते. प्राण्याला या नियमानुसार कापण्यात आलं नाही तर इस्लाम धर्मियांमध्ये त्याला हराम म्हटलं जातं. असं मांस खाण्याची परवानगी नसते. 

हलाल सर्टिफाइड म्हणजे काय?
व्हायरल व्हिडिओत हलाल या शब्दावरुन वाद सुरु आहे. पण हलाल सर्टिफिकेशन म्हणजे शुद्ध आणि इस्लामिक नियमांनुसार बनवण्यात आलेलं. म्हणजे शाकाहारी पदार्थांसाठी वापरण्यात आलेली शुद्ध सामग्री. त्या पदार्थात प्राण्याचे कोणतेही अंश नाहीत. दरम्यान, भारत सरकार असं कोणतंह सर्टिफिकेट देत नाही. भारतात जमीयत-उलमा-ए-महाराष्ट्र  आणि जमीयत-उलमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट या दोन संस्था सर्टिफिकेट देतात. काही मिठाईंमध्ये अल्कहोलचं प्रमाण असतं, अशी मिठाईदेखील हलाल सर्टिफिकेट दिलं जात नाही.