पश्चिम बंगालच्या घायाळ वाघीणीच्या विजयाची कहाणी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत अटीतटीचा राजकीय खेळ रंगला. 

Updated: May 2, 2021, 10:29 PM IST
पश्चिम बंगालच्या घायाळ वाघीणीच्या विजयाची कहाणी title=

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत अटीतटीचा राजकीय खेळ रंगला. एकीकडे केंद्रातील सत्ताधारी आणि पॉवरफुल भाजप आणि दुसरीकडे बांगलची वाघीण यांच्यात शेवटपर्यंत चुरशीचा सामना रंगलापण अखेर ममता दीदींनीच विजयी मिळवलाआणि विजयाची हॅटट्रिक साधली. तृणमूल काँग्रेसने दोनशे पार जागा जिंकल्या.

घायाळ वाघीण ही कधीही सगळ्यात जास्त भयानक आणि धोकादायक असते, आणि हेच या बंगालच्या वाघीणीने सिद्ध केले आहे. मोडलेला पाय घेऊन प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलेल्या ममतांनी एकहाती नव्हे, तर एकपायी विजयाचा झेंडा फडकवला.

2011 च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी कम्युनिस्ट लोकांची कित्येक वर्षांपासून सुरु असलेली सत्ता उलथवून लावली. 20 मे 2011 रोजी पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. तेव्हापासून पश्चिम बंगालमधला ममतांचा अभेद्य बालेकिल्ला कोणालाही जिंकता आलेला नाही.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत 42 पैकी 18 जागा जिंकून भाजपनं पश्चिम बंगालमध्ये जोरदार एन्ट्री केली. त्यामुळे ममता दीदींना पश्चिम बंगालमध्ये हरवले जाऊ शकते, अशा आशा त्यामुळं पल्लवित झाल्या. मग ममतांना हरवण्यासाठी भाजप वेगवेगळे पल्ले टाकू लागले. त्यासाठी त्यांनी सुवेंदू अधिकारी सारख्या तृणमूल काँग्रेसच्या बड्या नेत्याला आपल्या गटात सामील करून घेतलं. त्यानंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह वाघीणीच्या जंगलात उतरले आणि प्रचारसभांचा धुरळा उडवून दिला. मात्र एवढी जय्यत तयारी करूनही ममता दीदींनी जंगलातील आपले राज्य सोडले नाही.

वाघीणीने विजयाची डरकाळी फोडून पश्चिम बंगालमध्ये आपलच राज्य आहे, हे दाखवून दिलं. लागोपाठ तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवणा-या ममता दीदींनी आधी डाव्यांना आणि मग काँग्रेसला आपटी दिली.

आता तगड्या भाजपला पराभवाची धूळ चारताना डावे आणि काँग्रेसचं बंगालमधील नामोनिशाणच मिटवून टाकला आहे. त्यामुळं ममतांचा आत्मविश्वास निश्चितच दुणावला आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसमोर पंतप्रधानपदाचा नवा उमेदवार कोण? या प्रश्नाचं उत्तर बंगाली जनतेनं ममतांच्या गळ्यात विजयाची माळ घालून दिलं आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.