Cyclone Mocha मुळे कुठे उष्माघात तर कुठे धो-धो, पाहा तुमच्या राज्यातील स्थिती?

Cyclone Mocha :  महाराष्ट्राच्या काही भागात भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून उष्णतेची लाट येत असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता काही राज्यांत मुसळधार पाऊस तर काही राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

श्वेता चव्हाण | Updated: May 15, 2023, 01:56 PM IST
Cyclone Mocha मुळे कुठे उष्माघात तर कुठे धो-धो, पाहा तुमच्या राज्यातील स्थिती? title=
Cyclone Mocha Warning

Cyclone Mocha Update :  कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ (Cyclone Mocha) तयार झाले आहे. या चक्रीवादळाने आता उग्र रूप धारण केले असून ते ताशी 200 किमी वेगाने बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीवर धडकले आहे. त्यामुळे बांगलादेश-म्यानमार सीमेवर मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांनी किनाऱ्याजवळ जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाकडून (Meteorological Department) करण्यात आले. या वादळाचा परिणाम म्हणून देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट (Heat wave) येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

दरम्यान मोचा चक्रीवादळ सिडू चक्रीवादळानंतर (Cyclone Sidu) सर्वात मोठे चक्रीवादळ अहे. सिडू हे चक्रीवादळ हे नोव्हेंबर 2007 मध्ये बांगलादेशच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकले होते. या चक्रीवादळामुळे तीन हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. अशातच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मोचा चक्रवादळ रविवारी (14 मे 2023) म्यानमारच्या सीमेवर धडकले. म्यानमारच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर या चक्रीवादळाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज मोचा वादळाचा परिणाम म्हणून पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानसह दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

वाचा : राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा 40 शी पार, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?

तसेच या चक्रीवादळाचा परिणाम ईशान्य भारतातही दिसून येणार असून या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, पूर्व भारतातील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पूर्व भारतातील तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअस वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

नागरिकांना समुद्राजवळ जाण्यास मनाई 

पोलिस आणि प्रशासनाने लोकांना समुद्राजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले. गावागांवात लाऊडस्पीकरचा वापर करून प्रशासनाकडून लोकांना माहिती दिली जात आहे. तसेच हे वादळ आज (15 मे 2023) राज्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्वा मेदिनीपूर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांतील किनारी भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.