Weather Latest News: दिल्ली आणि उर्वरित (India weather) भारतामध्ये सध्या तापमानात काही अंशानी वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. सकाळच्या वेळी उत्तर भारत आणि देशातील (South india) दक्षिण किनारपट्टी भागामध्ये तापमानात वाढ झाली असून, उन्हाच्या झळाही नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. त्यामुळं आता थंडी (Winter) सरण्यास सुरुवात झाल्याचं स्पष्ट होत आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये येत्या काही दिवसांत किमान तापमान 10 अंशांहून जास्त राहील, तर कमाल तापमान 27 अंशांहूनही जास्त असेल. वाऱ्यांचा वेग ताशी 8 किमी इतका असेल.
एकिकडे थंडी सरतेय असं चित्र असतानाच देशाच्या इतर भागांमध्ये म्हणजेच पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील काहीर दुर्गम भागांमध्ये धुक्याची चादर असणार आहे. या भागांमध्ये सध्यातरी थंडीपासून दिलासा नसल्याची बाब हवामान खात्यानं स्पष्ट केली आहे.
फेब्रुवारी (February) महिना उजाडला असल्यामुळं सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये थंडी जोर धरेल आणि काही दिवसांतच काढता पाय घेण्यास सुरुवात करेल. हा काळ थंडीच्या परतण्याचा असून, आता उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात होणार आहे. या साऱ्यामध्ये पावसाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये पश्चिम भारतातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपात पावसाच्या सरी हजेरी लावतील. तर, देशाच्या पूर्वेकडे असणाऱ्या भागांमध्ये किमान तापमान स्थिर असेल. दक्षिण किनारपट्टी भागाही पावसाच्या सरींची हजेरी असेल असं सांगण्यात येत आहे. पुण्यात वातावरण कोरडं असेल. (Konkan) कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी ढगांची चादर असेल.
विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये थंडी काही अंशी कमी होणार असून, पश्चिमी झंझावातामुळं इथंही वातारणात काही बदल अपेक्षित आहेत. फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण देशात सरासरी 89 ते 122 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं सरासरी 27.2 टक्के इतका पाऊस या महिन्यात होऊ शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसतील. तर, गुजरातमध्येही पावसाची हजेरी असेल.
जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती जैसे थे
जम्मू काश्मीरचा (Jammu Kashmir) विचार करायचा झाल्यास इथं मात्र तापमानात फारसे बदल अपेक्षित नाहीत. काश्मीरच्या खोऱ्यात होणारी बर्फवृष्टी पुढील काही दिवस कायम असेल. ज्यामुळं इथं तापमान 2 अंशांच्या वर तूर्तास येणार नाही. रविवारी श्रीनगरमध्ये 1.8 अंश किमान तापमानाची नोंद झाली, तर काजीगुंड येथे तापमान शुन्याहूनही कमीच होतं.