नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या असंख्य व्हिडिओंच्या गर्दीत आता आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. हा व्हिडिओ आहे काँग्रेसच्या एका आमदारांचा. सहसा राजकीय नेतेमंडळींचे राजकारणाशीच संबंधीत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण, यावेळी मात्र या आमदारांपुढं आलेल्या एका अडचणीतून ते नेमके कसे बचावले यासंबंधीचा एक व्हिडिओ अनेकांचं लक्ष वेधत आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे आमदार हरिश धामी हे पुराच्या पाण्याचा प्रवाह ओलांडून जात असताना तोल जाऊन त्या पाण्यात पडल्याचं दिसत आहे. धामी यांचा तोल जाताच पाण्याचा वेग इतका जास्त होता की ते प्रवाहासोबतच पुढं जाऊ लागले. पण, सोबत असणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी त्यांची मदत करत कसंबसं त्यांना या अडचणीतून बाहेर काढलं.
पिथोरगड येथील धारचुलामध्ये ही घटना घडली. ज्यामध्ये पाण्यात असणाऱ्या दगडांमुळं धामी यांना हलकी दुखापत झाल्याचंही कळत आहे. गुरुवारी अतिवृष्टीमुळं प्रभावित झालेल्या एका गावाला भेट देऊन परततेवेळी ही घटना घडल्याचं वृत्त 'हिंदुस्तान टाईम्स'नं प्रसिद्ध केलं आहे.
#WATCH Uttarakhand: Congress MLA Harish Dhami had a narrow escape after he slipped while crossing a flooded rivulet in Dharchula area of Pithoragarh. He was rescued by party workers & supporters accompanying him. (30.07.2020) pic.twitter.com/9pZDHSd30T
— ANI (@ANI) July 31, 2020
धामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानकच पाण्याची पातळी वाढल्यामुळं तो प्रसंग ओढावला. 'त्या पाण्यामध्ये दगड आणि चिखलच होता. ते ओलांडून येतानाच माझा तोल गेला आणि मी पडलो. काही अंतरापर्यंत मी वाहत गेलो. पण, सोबत असणाऱ्या लोकांनी मला वाचवलं आणि त्या प्रवाहातून बाहेर काढलं', असं धामी म्हणाले.