आम्हीही कृतज्ञ! शरद पवारांसह 'या' नेतेमंडळींचा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना सलाम

सर्वांनीच आपल्या परिने मानले आभार...   

Updated: Mar 22, 2020, 06:44 PM IST
आम्हीही कृतज्ञ! शरद पवारांसह 'या' नेतेमंडळींचा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना सलाम title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कोरोना Corona व्हायरसचा लढा देत असताना भारतामध्ये दहशतीच्या या वातावरणातच एक वर्ग असाही आहे, जो सातत्याने कोरोना रुग्णांच्या सेवेत तत्पर आहे. पोलीस कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, पालिका कर्मचारी आणि कोरोना व्हायरच्या या काळात आपलं सहकार्य करण्यासाठी पुढे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा या वर्गात समावेश होतो. अशा या वर्गाप्रती २२ मार्च, म्हणजेच रविवारी सायंकाळी पाच वाजता संपूर्ण देशाने कृतज्ञता व्यक्त केली. 

विविधतेच एकता जपणाऱ्या या भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येकानेच या मंडळींप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यामध्ये राजकारणातील दिग्गज मंडळीही माहे राहिले नाहीत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्वांचेच आभार मानले. यावेळी त्यांच्या घरी असणाऱ्या व्यक्ती सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनीही टाळ्या वाजवत या संकल्पनेत साथ दिल्याचं पाहायला मिळालं. 

लोकसभेच्या अध्यक्षपदी असणाऱ्या ओम बिर्ला यांनीही यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घंटानाद करत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे आभार मानले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही टाळ्या, थाळ्यांचा नाद करत कृतज्ञता व्यक्त केली. 

नितीन गडकरी यांनीसुद्धा नागपूर येथे स्वगृही कुटुंबीयांसह आभार व्यक्त करण्यात सहभाग घेतला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सहकुटुंब थाळीनाद करत आणि टाळ्या वाजवत कोरोना व्हायरसचा लढा देण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले.