बंगळुरू : कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यात सर्वात मोठं धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलमट्टी या धरणाचे सर्व म्हणजेच २६ दरवाजे उघडण्यात आले आहेत, मागील तीन ते चार दिवसांपासून जवळपास १ लाख ८० हजार क्युसेक वेगानं या धरणातील पाणी नदी पात्रात सोडलं जात आहे. अशा या धरणावर आकर्षक अशी विद्युत रोषणाईसुद्धा करण्यात आली आहे. ज्यामुळं त्याचं बहुरंगी रुपच खऱ्या अर्थानं सर्वांना पाहता येत आहे.
तब्बल १२४ टीएमसी साठवण क्षमता असणारं हे धरण २००५ मध्ये बांधण्यात आलं होतं. अशा या धरणावर रोषणाई करण्यात आल्यामुळं सायंकाळच्या वेळी धरणाच्या पाण्यावर पडणारा हा रंगीच उजेड एक नयनरम्य दृश्य डोळ्यांचं पारणं फेडून जातं.
गेल्या काही दिवसांपासून देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. परिणामी अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात येत असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. अलमट्टी धरणाच्या बाबतीतही हेच चित्र पाहायला मिळालं. पण, या धरणाच्या दारांमधून पडणारं अतिवेगवान आणि फेसाळणारं पाणी खऱ्या अर्थानं वेगळे रंग दाखवताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात देशातही अलमट्टी आकर्षणाचा विषय ठरत आहे.