नवी दिल्ली : नोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याची योजना होती काय? असा रोखडा सवाल विचारत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर खरमरीत शब्दांत टीका केली आहे. आरबीआयने नोटबंदीमुळे बॅंकेकडे परत आलेल्या जुन्या नोटासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
दरम्यान, आरबीआयच्या अहवालावरून सरकारला घेरण्याचा विरोधकांचा विचार असतानाच, मोदी सरकारवर पहिला वार चिदंबरम यांनी केला आहे. आरबीआयने जाहीर केलेल्या वार्षीक अहवालात नोटबंदीच्या निर्णयानंतर १००० आणि ५०० रूपयांच्या ९९ टक्के नोटा बॅंकेकडे परत आल्याचे म्हटले आहे. आरबीआयने अहवालात दिलेल्या माहितीनुसार सुमारे १५ लाख ४४ हजार कोटी जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १५ लाख २८ हजार कोटी इतकी रक्कम बॅंकेकडे परत आली. दरम्यान, नोटबंदीनंतर १००० रूपयांच्या सुमारे ६३२.६ कोटी नोटांपैकी ८.९ कोटी नोटा आतापर्यंत परत आल्या नाहीत.
आरबीआयच्या अहवालाचा हवाला घेऊन माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे. पी. चिदंबरम आरबीआयच्या अहवालालाच आधार घेत म्हटले आहे की, १५४४,००० कोटी रूपयांच्या १,००० आणि ५०० रूपयांच्या नोटांपैकी १६००० कोटी रूपयांच्या नोटा परत आल्या नाहीत. एकूण छापलेल्या नोटांच्या तुलनेत केवळ १ टक्का आहेत. त्यामुळे आरबीआयला खेद वाटायला पाहिजे. कारण आरबीआयने नोटबंदीचे समर्थन केले होते, असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.