नवी दिल्ली : विमानातील क्रू मेंबर्स बनण्यासाठी काही नियम व अटी ठरलेल्या असतात. तुमचे वजन, उंची, वय यावरून क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या ठरत असतात. रुजू झाल्यावरही त्यांना या गोष्टी काटेकोरपण पाळाव्या लागतात. स्वत:च्या पेहरावाकडेही त्यांना विशेष लक्ष द्यावे लागते. विमानातील महिला क्रू म्हणजे गोऱ्या, उंच हिल्स, स्कर्ट अशी प्रतिमा समोर येते. पण आता याची अनिवार्यताही यापुढे नसणार आहे. वर्जिन अटलांटीका एअरलाईन्सने हा निर्णय घेतला आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे.
पारंपारिक अटी आणि नियमांना बगल देत वर्जिन अटलांटीकाने काही निर्णय घेतले आहेत. यानुसार महिला केबिन क्रू मेंबर्सना मेकअप करणे अनिवार्य नसणार आहे. वर्जिन एअरलाईन्सचे कार्यकारी उपाध्यक्षांनी हफींग्टोन पोस्टला या संदर्भात माहिती दिली आहे. आम्ही लोकांचे विचार ऐकले आणि त्या आधारावर आम्ही आमची स्टाईल आणि सौंदर्य धोरण ठरवल्याचे ते म्हणाले. वर्जिन अटलांटीका फ्लाईटमधील कोणताही क्रू मेंबर मेकअप करु इच्छित असल्यास त्याला एअरलाईन्सने आखून दिलेल्या कलर पॅलेटच्या अनुसार करावे लागेल असे सांगण्यात आले आहे.
झालेल्या बदलनानुसार महिला आणि पुरूष क्रू मेंबर्संना कोणत्याही प्रकारचा मेकअप अनिवार्य नसणार आहे. त्यांना स्वत:च्या मेकअपचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महिलांना ट्राऊसर्स परिधान करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याआधीच्या पॉलिसीनुसार महिलांना किमान ब्लश, मस्करा आणि लाल लिपस्टिक लावणे गरजेचे होते.
लाल रंगाचा युनिफॉर्म ही वर्जिन एअरलाईन्सची ओळख आहे. पण एक ब्राण्ड म्हणून आम्ही प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करत आहोत असे वर्जिन अटलांटीकाचे ब्राण्ड मॅनेजर डेविड हॉड्ज यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही आमची शैली आणि सौंदर्यप्रसाधनांप्रतीचे धोरण सतत बदलत असतो. यामध्ये कर्मचारी आपले विचार मांडत असतात. त्यांना स्वत:च्या पेहरावासाठी अभिव्यक्ती असणार आहे. प्रवाशांप्रमाणेच राहून त्यांना सहकार्य करणारे ही आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले.