Viral Video: एखाद्या संकटात व्यक्ती कशी वागते यावरुन त्याचा खरा स्वभाव कळत असतो. भूकंपासारख्या घटनेत याची प्रकर्षाने जाणीव होते. कारण यावेळी प्रत्येकजण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अशा संकटातही जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्यासाठी धावते तेव्हा त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असतं. मंगळवारी रात्री उत्तर भारतासह दक्षिण आशियातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा अशीच एक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
भूकंपाचा धक्का बसल्यानंतर एकीकडे लोक घऱ सोडून मोकळ्या जागेत पळत असताना काश्मीरमधील डॉक्टरांचा एक ग्रुप मात्र एका महिलेची प्रसूती करत होता. डॉक्टरांनी यावेळी महिलेचा सीझर करत बाळ जन्माला घातलं आहे. बाळ एकदम सुरक्षित असल्याने डॉक्टरांसह बाळाच्या आईनेही सुटकेचा निश्वास सोडला.
अनंतनाग जिल्हा प्रशासनाने ऑपरेशन रुममधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओत भूकंपाचे धक्के बसत असतानाही काही आरोग्य कर्मचारी मास्क आणि ग्लोव्ह्ज घालत सर्जरी करत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये भूकंपामुळे ओव्हरहेड लाईट्स, मॉनिटर आणि आयव्ही ड्रीप स्टँड हलताना दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये डॉक्टर 'बाळाला सुरक्षित ठेवा' असं सांगताना ऐकू येत आहे. दुसरीकडे व्हिडीओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती प्रार्थना करत आहे. यानंतर काही वेळाने लाईट जाते आणि सगळा अंधार होते. यावेळी फक्त मॉनिटरचा प्रकाश असतो.
Emergency LSCS was going-on at SDH Bijbehara Anantnag during which strong tremors of Earthquake were felt.
Kudos to staff of SDH Bijbehara who conducted the LSCS smoothly & Thank God,everything is Alright.@HealthMedicalE1 @iasbhupinder @DCAnantnag @basharatias_dr @DHSKashmir pic.twitter.com/Pdtt8IHRnh— CMO Anantnag Official (@cmo_anantnag) March 21, 2023
काही सेकंदासाठी भूकंपाचे धक्के आणि अंधार होता. लाईट आल्यानंतर तिन्ही आरोग्य कर्मचारी पुन्हा एकदा ऑपरेशनला सुरुवात करतात. यावेळी एक कर्मचारी आपल्या सहकाऱ्याला सांगतो की, "घाबरु नका. सर्व काही ठीक आहे".
जिल्हा आरोग्य प्रशासनाने हा व्हिडीओ शेअर करताना इतक्या संकटातही रुग्णालय कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे.
दरम्यान भूकंपामुळे एकूण 11 मृत्यूंची नोंद झाली आहे. यामधील 2 मृत्यू अफगाणिस्तान आणि 9 मृत्यू पाकिस्तानात झाले आहेत. 6.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. अफगाणिस्तानमधील हिंदू कुश पर्वत या भूकंपाचं केंद्र होता.