22 सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले तर चांद्रयान 3 मोहिमेत येणार मोठा ट्विस्ट

22 सप्टेंबर 2023 या दिवशी इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर चांद्रयान 3 मोहिम पुन्हा भरारी घेणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 21, 2023, 09:31 PM IST
22 सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले तर चांद्रयान 3 मोहिमेत येणार मोठा ट्विस्ट  title=

Chandrayaan 3 News : 22 सप्टेंबर 2023... हा दिवस भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेसाठी आशेचा किरण ठरणार आहे. या दिवशी चंद्राच्या शिवशक्ती पॉईंटवर  सूर्योदय होणार आहे. या सूर्योदयासह  भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेसाठी देखील नवी पहाट ठरणार आहे. 22 सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले तर चांद्रयान 3 मोहिमेत मोठा ट्विस्ट येणार आहे. इस्रोची टीम चांद्रयान 3 मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी करत आहे.

सूर्य किरणावर अवलंबून आहे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे भवितव्य

सध्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी विक्रम लँडर स्लीप मोडवर पार्क करण्यात आले आहेत तेथे सूर्यप्रकाश 13 अंशांवर पडत आहे. या कोनाची सुरुवात 0 अंशापासून सुरू झाली आणि 13 वाजता संपली. म्हणजेच विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरवर सूर्यप्रकाश वाकडा पडत आहे. 6 ते 9 अंशांच्या कोनात असलेल्या सूर्यप्रकाशात विक्रमला रिचार्ज करण्यासाठी पुरेशी ऊर्जा देण्याची क्षमता असते.  विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर प्रत्यक्षात पुन्हा कार्यन्वित होणार की नाही याबाबत 22 सप्टेंबरलाच समजेल अशी माहिती इस्रोच्या यूआर राव उपग्रह केंद्राचे संचालक एम शंकरन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर प्रत्यक्षात पुन्हा कार्यन्वित झाले तर, चांद्रयान 3 मोहिमेत  मोठा ट्विस्ट येईल हा क्षण इस्त्रोसाठी बोनस पॉइंट ठरेल. चंद्रावर दुसऱ्या टप्प्यातील संशोधन करणे शक्य होणार आहे. 

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने भरपूर डेटा गोळा केलाय

14 जुलै 2023 रोजी चंद्राकडे झेपावलेले चांद्रयान 3 हे   23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर लँड झाले. तब्बल 14 दिवस चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या संशोधन केले. चंद्रावरील तापमान, हवामान, चंद्रावर होणारे भूकंप तसेच ऑक्सिजन, आर्यन तसेच इतर खनिजे या संदर्भातील भरपूर डेटा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने  गोळा केला आहे. 

मायनस 250 डिग्री तापमानाचा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरवर काय परिणाम झालाय? 

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचे रिसीव्हर ऑन आहेत.  22 सप्टेंबरला इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे. दिवसा चंद्रावर 120 अंश सेल्सियस इतके तापमान असते. याचा कोणताही परिणाम  विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर झालेला नाही. मात्र, रात्रीच्या मायनस 250 डिग्री तापमानाचा याच्या उपकरणांवर काय परिणाम झालाय हे सूर्यप्रकाशात बॅटरी चार्ज झाल्यानंतर समजेल.