Crime News : आसाममधील (Assam) एका महिला डॉक्टरने तिच्या कुटुंबीयांवरच धमकावल्याचा आरोप केला आहे. हिंदू धर्म स्वीकारला आहे आणि त्यामुळे तिचे कुटुंबीय मला धमकावत आहेत आणि त्यामुळे मला लपून रहावे लागत आहे, असे या महिला डॉक्टरने एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची आता आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी दखल घेतली असून पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यास सांगितले.
3 सप्टेंबर 2023 रोजी, सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आला होता. व्हिडीओमध्ये एक महिला स्वतःला आसाम मेडिकल कॉलेज आणि दिब्रुगढ येथील रुग्णालयातील एक महिला डॉक्टर असल्याचे सांगत तिचे कुटुंबीय तिला जाणूनबुजून हिंदू धर्म स्वीकारल्याबद्दल जीवे मारण्याची धमकी देत आहेत असे सांगत होती. महिलेने असेही सांगितले की तिचे कुटुंब तिचे लग्न एका मोठ्या मौलवीशी करण्याचा प्रयत्न करत आहे, जे तिला मान्य नाही. हा व्हिडिओ व्हायरल होताच, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांनी आसामच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची योग्य चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
जेव्हा कुटुंबाने तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत घेतली तेव्हा या महिला डॉक्टरने व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. आपण सुरक्षित असून मी स्वेच्छेने हे केले आहे. आपण हिंदू धर्म स्विकारल्याने कुटुंब अस्वस्थ होते आणि त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळेच मी लपून बसली आहे, असा दावा महिलेने व्हिडीओमध्ये केला आहे.
Take action as per Law after a proper enquiry @gpsinghips https://t.co/JTLLjW25jW
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) September 3, 2023
डॉक्टर महिलेचा भाऊ वकील खान याने यापूर्वी तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत घेतली होती. पोलीस महासंचालक जीपी सिंग यांना ट्विटरवरुन याची माहिती दिली आहे. 'माझी मोठी बहीण 17 ऑगस्टपासून तिनसुकिया येथील हापजन प्राथमिक आरोग्य केंद्रातून बेपत्ता झाली होती. तिथे ती काम करत होती. मला नऊ लाख रुपये देण्यासाठी फोन आला होता. तिने पाठवलेला व्हिडीओ खोटा आहे. माझी बहीण काहीतरी गंभीर परिस्थितीत असू शकते,' असे वकील खान याने पोलिसांना सांगितले होते.
दुसरीकडे व्हायरल व्हिडीओमध्ये डॉक्टर महिलेनं आसाम पोलिसांना मदतीची विनंती करत परिस्थितीची दखल घेण्यास सांगितले आहे. आसाम पोलिसांनी देखील या प्रकरणात तपास सुरु असल्याचे सांगितले आहे.