पत्त्यांप्रमाणे कोसळली तीन मजली इमारत

 एकाएकी ही ईमारत पडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 12, 2017, 11:08 AM IST
पत्त्यांप्रमाणे कोसळली तीन मजली इमारत title=

गुंटूर: आंध्रप्रदेशमधील गुंटूर येथे अचानक तीन मजली इमारत जमिनदोस्त झाली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. पण एकाएकी ही ईमारत पडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गुंटुर प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

नाल्यासाठी खोदकाम

मिळालेल्या माहितीनुसार, गुंटूर महापालिकेने अतिक्रमणाविरोधात मोहीम सुरू केली आहे. रस्त्याच्या शेजारील बेकायदा बांधकामे काढुन रस्ते मोकळे केले जात आहेत.  याच अंतर्गत मणी हॉटेल सेंटरच्या नंदीव्हेल्गू मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात आले होते. अनेक अनधिकृत इमारतींची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आधीच महामंडळाच्या निर्देशांनुसार घर रिकामे केले होते. पाण्याचा निचरा होण्यासाठी तिथे नाल्याची निर्मिती करण्यात येणार आहे.

धोका लक्षात आला

नाल्याच्या लगत एन नरसिंह यांच्या घराचा पुढचा भागही या कारवाईअतर्गत तोडण्यात आला.  नरसिंह यांनी तुटलेली भाग दुरुस्त करुन दोन मजले बांधले होते. ही इमारत १२ वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते. नाला खोदत असताना नरसिंह यांच्या घरी कंप जाणवत असल्याचे निगम कर्मचाऱ्यांच्याही निदर्शनास आले होते. 

जागा केली रिकामी

महापालिकेच्या कर्मचार्यांनी धोका टाळण्यासाठी संपूर्ण जागा रिकामी करुन घेतली. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण इमारत जमिनीवर पत्त्याप्रमाणे कोसळली. तसेच सभोवतालच्या इमारती देखील खराब झाल्या आहेत. संपूर्ण घटना मोबाईल फोनमध्ये लोकांनी रेकॉर्ड केली. 

व्हडिओ व्हायरल

सोशल मीडियावर इमारत पडतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोणत्याही पिलरशिवाय दोन नवे मजले बनविले जात होते ज्याचा भार इमारत पेलू न शकल्याने इमारत कोसळल्याचे गुंटूर नगर महामंडळाने सांगितले.

मालकाविरुद्ध कारवाई

अवैध बांधकाम प्रकल्पासाठी  नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतरही बांधकाम सुरू होते. इमारतीच्या मालकाविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असे जीएमसीचे आयुक्त अनुराधा चौधरी यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे आणि चौकशीनंतर बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.