मुंबई : एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड हे देशाचे पुढील उपराष्ट्रपती असतील. निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला आहे. धनखड यांच्या या विजयाचे अनेक अर्थ आहेत. ज्या उद्देशाने भाजपने धनखड यांना उमेदवारी दिली होती, तो उद्देश आता बर्याच प्रमाणात यशस्वी होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. धनखड हे एक लढाऊ व्यक्तीमत्व असून जाट समाजात त्यांची चांगली पकड असल्याचे मानले जाते.
आज सकाळी 10 वाजल्यापासून राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांनी उपराष्ट्रपतीसाठी मतदानाला सुरुवात केली. तृणमूल काँग्रेसने यापूर्वीच त्यांचे खासदार मतदान करणार नसल्याचे जाहीर केले होते. अशा प्रकारे एकूण 725 खासदारांनी मतदान केले. 15 मते रद्द झाली. जगदीप धनखड यांना एकूण 710 वैध मतांपैकी 528 मते मिळाली, तर विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना केवळ 182 मते मिळाली.
धनखड यांच्या विजयाचा भाजपला काय फायदा होऊ शकतो?
जगदीप धनखर राजस्थानच्या जाट कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचा कौटुंबिक व्यवसाय हा शेती आहे. म्हणजे एक प्रकारे ते शेतकरी कुटुंबातील आहेत. गेल्या दोन वर्षांत भाजपला सर्वात जास्त त्रास शेतकरी आणि जाट समाजातील लोकांकडून झाला आहे. हे सर्व घडले ते कृषी विधेयकाच्या विरोधात उभ्या राहिलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे. त्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक केंद्र सरकार आणि भाजपच्या विरोधात सतत आवाज उठवत असतात. मलिकही जाट समाजातून येतात. अशा स्थितीत आता भाजपला अनेक प्रकारे फायदा होणार आहे.
1. जाट समाजाची नाराजी दूर होणार : शेतकरी आंदोलनामुळे पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये राहणारे जाट समाजाचे लोक भाजप सरकारच्या विरोधात गेले होते. पुढील वर्षी राजस्थान, मध्य प्रदेश आणि त्यानंतर 2024 मध्ये हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत. यापैकी राजस्थान, हरियाणात जाट समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. याशिवाय दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाबमध्येही जाट मतदारांची संख्या खूप जास्त आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हे जाट मतदार एकत्र आले तर भाजपसाठी विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो.
2. शेतकरी, वकिलांचा पाठिंबा : धनखड हे शेतकरी कुटुंबातून येतात. अशा स्थितीत ते उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भाजपप्रती असलेली नाराजी दूर होऊ शकते. याशिवाय धनखड यांनी वकिली करून कारकिर्दीची सुरुवात केली आहे. देशभरात वकिली व्यवसायात 10 लाखांहून अधिक लोक आहेत. अशा स्थितीत भाजपला वकिलांचाही पाठिंबा मिळू शकतो. धनखड यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवताना पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपच्या सर्व नेत्यांनी त्यांना शेतकऱ्याचा मुलगा म्हटले होते.
3. सत्यपाल मलिक यांना मिळणार उत्तर : मेघालयचे राज्यपालही जाट समाजातून येतात. ते सध्या केंद्र सरकारच्या विरोधात बोलत आहेत. मलिक हे जाट समाज आणि शेतकऱ्यांना भडकावत असल्याचा आरोपही भाजपच्या काही नेत्यांकडून करण्यात आला होता. अशा स्थितीत धनखड उपराष्ट्रपती झाल्यामुळे भाजपही मलिक यांना उत्तर देऊ शकते.