उदयनराजेंच्या शपथविधीच्या वादावर वैंकय्या नायडूंचं स्पष्टीकरण

भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी खासदारकीची शपथ घेतली. 

Updated: Jul 23, 2020, 03:51 PM IST
उदयनराजेंच्या शपथविधीच्या वादावर वैंकय्या नायडूंचं स्पष्टीकरण title=

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी खासदारकीची शपथ घेतली. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली. या सगळ्या प्रकारानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने नायडूंवर टीका केली. 

'भाजपला शिवाजी महाराज केवळ निवडणुकांपुरते हवे असतात'

या सगळ्या टीकेनंतर आता वैंकय्या नायडू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आणि देवी भवानीचा भक्त आहे. रिती-रिवाजानुसार शपथ घेताना कोणत्याही प्रकारच्या घोषणा दिल्या जात नाहीत, याची आठवण मी सदस्यांना करून दिली. कोणताच अनादर केला नाही, असं ट्विट वैंकय्या नायडूंनी केलं आहे. 

 

'दिल्लीत छत्रपतींच्या वंशजांचा अपमान, भाजप आणि संभाजी भिडे शांत का?'

राज्यसभेत नेमकं काय झालं?

उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली. यानंतर उदयनराजे भोसले कागदपत्रांवर स्वाक्षरी करत असताना सभापती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले की, हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात  हे लक्षात ठेवावे. हे सांगत असताना उदयनराजेंनी नायडू यांच्याकडे कटाक्ष टाकला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 

दरम्यान या सगळ्या वादावर उदयनराजे भोसले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण नको, असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.