पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’

भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धअभ्यास सुरु झाला आहे.  

Updated: Feb 16, 2019, 11:06 PM IST
पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’ title=

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी झाली आहेत. दिवसासह रात्रीही आयुधे आणि शस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.

राजस्थानच्या पोखरणमध्ये हवाई दलाने युद्धसरावादरम्यान आपले जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सरकार आम्हाला जी जबाबदारी देईल, ती स्वीकारण्यास हवाई दलाचे जवान सज्ज असल्याचे हवाईदल प्रमुख एअर मार्शल बी.एस. धनोआ यांनी स्पष्ट केले आहे. मोहीम फत्ते करण्यात हवाई दलाचे जवान आघाडीवर असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी भारत रत्न सचिन तेंडुलकर,  हवाईदल प्रमुख एअर मार्शल बी.एस. धनोआ उपस्थित होते.

पोखरणमध्ये हवाई दलाने आयोजित केलेल्या ‘वायुशक्ती २०१९’ या युद्धसरावात सुखोई ३०, मिग २९, मिराज २०००, जगुआर, मिग २७ या लढाऊ विमानांनी शक्तीप्रदर्शन केले. आकाशातून जमिनीवर मारा करणाऱ्या विमानांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. भारताने या हल्ल्यानंतर कडक पावले उचलण्याचा पाकिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करण्याबाबतही विचार सुरू आहे. त्यामुळे या सरावाला महत्व प्राप्त झाले आहे.