नवी दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मजूर आणि गरीब कुटुंबांना अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे कामच बंद झाल्यामुळे त्यांच्याकडे दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे उरलेले नाहीत. आतापर्यंत अशा मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटनांचे व्हीडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत. यानंतर सोशल मीडियावर आणखी एक छायाचित्र प्रचंड व्हायरल होत आहे.
हे छायाचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातील आहे. येथील बारगाव जिल्ह्यातील कोरीपूर गावात काही लहान मुले डाळीच्या रोपांची पाने खाताना दिसत आहेत. मुसाहर जमातीमधील या मुलांची ही अवस्था पाहून अनेकजण हेलावून गेले आहेत. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर स्थानिक प्रशासनाला जाग आली.
यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करत या मुलांच्या कुटुंबीयांपर्यंत अन्नधान्य पोहोचवण्याचे आदेश दिले. जिल्हा दंडाधिकारी कौशल राज यांनी 'द इंडियन एक्स्प्रेस'शी बोलतान सांगितले की, गावातील लहान मुले डाळीच्या रोपांची पानं खातात. ही लहान मुलेही तशाचप्रकारे पानं खात होती. या कुटुंबाकडे रेशन कार्ड असून त्यांना महिनाभराचा शिधा मिळाला आहे. मात्र, आता त्यांना पुन्हा एकदा जास्तीचे अन्नधान्य देण्यात आल्याचे कौशल राज यांनी सांगितले.
या भागातील अनेकजण मजुरी आणि रोजंदारीचे काम करतात. या घटनेनंतर पोलिसांनी या वस्तीमध्ये फिरून सगळ्यांची विचारपूस केली. तुम्हाला जीवनावश्यक वस्तू लागल्यास गावच्या सरपंचाकडे जा. त्यांनी ऐकले नाही तर मग आमच्याकडे या, असे सांगत पोलिसांनी या लोकांना आश्वस्त केले.